अहिल्यानगर – नव्या वर्षात महानगरपालिकेकडून अधिक चांगल्या सेवा, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. येत्या वर्षात सध्या सुरू असलेल्या प्रकल्प, योजनांना गती देऊन नाट्यगृह, क्रीडा संकुले,
अद्ययावत रुग्णालय, ई बस सेवा, सीना नदी सुशोभीकरण आदी प्रमुख योजना व प्रगतीपथावर असलेली रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा निर्धार महानगरपालिकेने केला असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.
नवीन वर्षात पदार्पण करताना आयुक्त यशवंत डांगे यांनी आगामी वर्षात राबवायचा योजना, शहरातील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना, दैनंदिन सेवा व सुविधा बळकट करण्यासाठी नियोजन, स्वच्छता व कचरा संकलन सेवा बळकट करुन स्वच्छ व सुंदर शहर संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संकल्प केला आहे. सद्यस्थितीत शहरात राज्य सरकारने दिलेल्या व आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून सुमारे दीडशे रस्त्यांची कामे सुरू आहेत.
ही सर्व कामे येत्या वर्षात पूर्ण करून नागरिकांना चांगले रस्ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. नाट्यगृह, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्युझिकल फाऊंटन, सीना नदी परिसर सुशोभीकरण ही कामे प्रगतीपथावर आहेत. रुग्णालयाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. ही कामे पूर्ण करून चांगल्या व दर्जेदार सुविधा, सेवा उपलब्ध करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.
तसेच, अहिल्यानगर शहर स्वच्छ शहर म्हणून विकसित व्हावे, यासाठी दर शनिवारी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. कचरा संकलन व्यवस्थेवर अधिक लक्ष केंद्रीत करून नागरिकांच्या घरी दररोज घंटागाडी जाईल, यासाठी नियोजन सुरू आहे.
यासह माझी वसुंधरा अभियान ५.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२५ प्रभावीपणे शहरात राबवण्यात येणार आहे. मागील वर्षीपेक्षा चांगले मानांकन मिळवण्यासाठी व माझी वसुंधरा अभियानात पुन्हा पारितोषिक मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी सातत्याने कारवाई सुरू राहणार आहे. शहराचे विद्रुपीकरण होऊ नये, यासाठी फ्लेक्स मुक्त शहर अभियान राबविण्यात येत आहे. शहरात वृक्ष गणना करणे, तसेच नगर शहरातील उद्याने विकसित करून नागरिकांना मनोरंजन व विरंगुळासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या कर वसुलीला गती देऊन १०० टक्के वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विविध पथके तयार केली आहेत. या द्वारे वसुली, कारवाई केली जाणार आहे. अधिकृत नळ कनेक्शन तपासून ते बंद करण्यात येतील.
महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी नवीन व्यापारी संकुल उभारणे, प्रलंबित असलेले नेहरू मार्केट, प्रोफेसर कॉलनी चौक येथील व्यापारी संकुल नव्याने विकसित करणे, इतर संकुलांचा आढावा घेऊन दुरवस्था झालेल्या संकुलांचे नूतनीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नागरी सेवा बळकट करतानाच जन्म व मृत्यू दाखल्याचे काम अधिक सुरळीतपणे पार पडावे, नागरीकांना जलद व वेळेत दाखले मिळावेत, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य सेवेतील त्रुटी दूर करून शहरात नव्याने उभारण्यात आलेली १२ आरोग्यवर्धीनी केंद्रे व महानगरपालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
त्यासाठी महिन्यातून किमान एक वेळा प्रत्येक आरोग्य केंद्राची स्वतः तपासणी करणार आहे. महानगरपालिकेचे कामकाज दैनंदिन वेळेत सुरळीत सुरू राहावे, यासाठी कर्मचाऱ्यांना शिस्त लावून ते वेळेत कामावर हजर राहतील, यासाठी प्रत्येक विभागात अचानक तपासणी करून हजेरी घेतली जाणार आहे.
नागरीक व महानगरपालिका यांच्यात समन्वय वाढवून महानगरपालिकेच्या योजना, उपक्रम थेट नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी, नागरीकांना प्रशासनाशी थेट संपर्क साधता यावा, मोबाईलवरून थेट तक्रार दखल करता यावी, यासाठी नव्याने सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे.
व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न येत्या वर्षात महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी करतील, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केला आहे.