Ahmednagar News : समन्यायी पाणी वाटपानुसार सध्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले आहे. परंतु पाणी सोडणे बंद करत्यावेळी गोदावरी, मुळा व प्रवरा नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून देण्यात यावेत, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्यानुसार जलसंपदा विभागाने नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा व मुळा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडले आहे.

हे पाणी सोडण्यासाठी गोदावरी, मुळा व प्रवरा नदीपात्रात असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या फळ्या काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे बंधाऱ्यात असलेले पाणीही खाली झाले आहे.
धरणातून सोडण्यात आले पाणी बंद झाल्यानंतर हे बंधारे कोरडेठाक पडणार असल्याने नदीकाठच्या गावांसह परिसरात पाणी टंचाईची स्थिती निर्माण होणार आहे. गोदावरी नदीपात्रात श्रीरामपूर तालुक्यात नाऊर, सराला बेट, कमालपुर तर प्रवरा नदीपात्रात कोल्हार, गंगापूर, केसपूर, वळदगाव, पढेगाव, मालूंजा आदी तसेच मुळा नदीपात्रात राहुरी तालुक्यात मांजरी व वांजुळपोई हे बंधारे आहेत.
जायकवाडीसाठी सोडलेले पाणी बंद केल्यानंतर नदीपात्रातील हे सर्व बंधारे भरून देण्याची मागणी नदी काठावरील गावातील व परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
ही मागणी विचारात घेता जायकवाडीस पाणी सोडणे बंद करतेवेळी गोदावरी, मुळा व प्रवरा नदीपात्रातील बंधाऱ्याच्या फळ्या पूर्ववत टाकून हे बंधारे भरून देण्यात यावेत, अशी मागणी आ. कानडे यांनी केली असून याबाबत त्यांनी जलसंपदा विभागाचे नाशिक व अहमदनगर येथील मुख्य कार्यकारी अभियंता यांना पत्र दिले आहे.













