तलाठी उमेदवारांचे उपोषण निवड होऊन देखील भरतीसाठी दिरंगाई होत असल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- तलाठी भरती 2019 ची अंतिम निवड होऊन देखील भरतीसाठी दिरंगाई होत असल्याने त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने तलाठी उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण केले.

यावेळी सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष संदीप लगड, प्रसाद बिराजदार, सतीश धरम, तुषार काळे, विजय मोरे, कांचन धाडगे, सोनाली जराड, चंद्रकांत नवाळी, दत्ता कोळपे, जीवन हजारे, प्रवीण जाधव आदीसह तलाठी उमेदवार उपस्थित होते.

तलाठी भरतीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवार गेल्या वर्षभरापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. सदर उमेदवारांनी वारंवार लेखी व तोंडी स्वरूपात या विषयाचा पाठपुरावा करून सुद्धा अद्याप त्यांना ठोस आश्‍वासन मिळालेले नाही.

दि.2 डिसेंबर 2020 च्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार त्यांना लवकरात लवकर नियुक्ती मिळणे अपेक्षित होते. तरीही ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता सुरू होईपर्यंत विविध कारणे देऊन विषय प्रलंबित ठेवण्यात आला होता.

आचारसहिता संपल्यावर ताबडतोब नियुक्ती देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. आचारसंहिता संपुष्टात येऊन आज बरेच दिवस उलटून गेले असले तरी कुठल्याही प्रकारे प्रशासनाच्या वतीने लेखी स्वरुपात प्रकटन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.

अथवा निवड यादी लावण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व उमेदवार प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन तलाठी भरती 2019 ची अंतिम निवड यादी जाहीर करण्याची मागणी तलाठी उमेदवारांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment