नगरची शिवसेना ठाकरेंसोबत, कोरगावकरांनी आरोप फेटाळले

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News:नगरमधील शिवसेनेचे काही आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले असले तरी त्यांच्यासह सर्वजण शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबतच आहेत, असा दावा शिवसेनेचे नगरचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी केला आहे.

काही पदाधिकाऱ्यांनी कोरगावर यांच्यावरच पूर्वी आरोप केले होते. त्यांनी तेही फेटाळून लावले असून याचे पुरावे दिले तर स्वत: पद सोडून देईन, असेही कोरगावकर म्हणाले.मुख्य म्हणजे जे पदाधिकारी शिंदे यांना भेटायला गेले होते, ते त्यांच्या गटात जाण्यासाठी नव्हे तर पूर्वी शिंदे यांनी त्यांना केलेल्या मदतीची जाणीव ठेवत ते गुरूपौर्णिमेनिमित्त शिंदे यांना भेटले,

असे सांगत कोरगावकर यांनी या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.कोरगावकर आज नगरला आले होते. त्यांनी येथे शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका मांडली.

त्यांनी सांगितले की आज झालेल्या बैठकीत सर्वांनी ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. इतर ठिकाणी जसे प्रतिज्ञापत्र भरून घेतले जात आहे, तसे नगरमधूनही भरून घेण्यात येत आहे.

आजच्या बैठकीत सर्वांना पक्षांतरबंदी कायदा आणि एकूणच कायदेशीर प्रक्रियेसंबंधीची माहिती देण्यात आली आहे. सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी आमच्यासोबत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe