नावात काय आहे असं म्हणतात. परंतु, नावातच खरी ओळख लपलेली असते. सजीव- निर्जीव प्रत्येकालाच काही ना काही नाव असतं. त्यातूनच त्याची ओळख पटते. शहराला, गावाला, खेड्यालाही एक विशिष्ट नावाने ओळखलं जातं. असंच महाराष्ट्रात एक गाव आहे, जे उच्चारताना काहींना लाज वाटते. परंतु या नावामागेही मोठा इतिहास आहे, हे अनेकांना माहित नाही.
अपभ्रंश होऊन मिळालं नाव
आपल्या नावामुळे महाराष्ट्रात चर्चेत राहणारं गाव आहे, पुण्याजवळचं भोसरी. पुण्याबरोबरच भोसरीचाही खूप विकास झाला आहे. हे गावही महाराष्ट्राच्या नकाशात दिमाखात उभं आहे. मात्र या नावामुळे हे गाव अनेकदा चर्चेत राहतं. मुळात भोसरी हे नाव पहिल्यापासून नव्हतं. तर या गावाच्या नावाचा अपभ्रंश होऊन हे नाव तयार झालं आहे, हे अनेकांना माहित नाही.

काय होतं मुळ नाव
हे गाव राजा भोस यांची राजधानी होती, असं सांगितलं जातं. या गावाची ओळख पूर्वी भोजापुरी होती. याच भोजापुरी नावाचा अपभ्रंश होऊन ते आता भोसरी झाल्याचं काहींच म्हणणं आहे. पुणे शहराच्या उत्तरेला सतरा किलोमीटरवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत हे गाव येतं. भोसरी गावचा इतिहास फार प्राचीन आहे. प्राचीन काळापासून भोजापूर, भवसरी अशा नावाने प्रवास करत भोसरी हे नाव मिळाले आहे.
कसे पडले गावाला नाव
राजा भोज यांची राजधानी म्हणून हे भोजापुरी नावाने ओळखले जायचे. या नावाचा अपभ्रंश भोसावरी आणि त्यानंतर भोसरी असा झाला आहे. आता हे गाव भोसरी म्हणूनच ओळखले जाते. भोसरीत इतिहासाच्या खाणाखुणा सापडल्या आहेत. मातीचे मडके तसेच काही बांधकामाच्या विटा आढळून आल्या असून हे मडके सातवाहन काळातील म्हणजे इ.स.पूर्वी 200 ते 280 च्या काळातील असल्याचे संशोधकांनी सिद्ध केले आहे. भोसरीतील ग्रामस्थांनी जत्रा-उत्सव, बैलगाडा शर्यत, कुस्त्यांचा आखाडा, तालीम मंडळ जपत गावपण जपले आहे. येथे भावसार समाजाची संख्या जास्त असल्याने काहींच्या मते भावसार या शब्दावरुन या गावाला भोसरी हे नाव पडलं असावं.