मागील आर्थिक वर्षात महानगरपालिकेची विक्रमी कर वसुली
वर्षभरात ६१.१८ कोटींचा कर जमा; शास्तीमाफी योजनेत १७.१८ कोटी वसूल

वसुलीच्या चांगल्या कामाबद्दल उपायुक्त, प्रभाग अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव
नवीन वर्षात १०० कोटींहून अधिक वसुलीचे उद्दिष्ट : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर – सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची विक्रमी वसुली झाली आहे. वर्षभरात ७२०६६ करदात्यांनी कर भरला असून ६१.१८ कोटींची वसुली झाली आहे. शास्तीमाफी योजनेत १६७८७ करदात्यांनी लाभ घेऊन १७.१८ कोटींचा कर भरला आहे. त्यामुळे वर्षभरात ८०.५८ कोटींच्या वसुलीची नोंद होऊन १९.३९ कोटींची सवलत देण्यात आली व ६१.१८ कोटी रुपये महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. विक्रमी वसुली केल्याबद्दल आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी उपायुक्तांसह वसुली विभागाचे अधिकारी, सर्व प्रभाग अधिकारी व वसुली कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच, नव्या आर्थिक वर्षात १०० कोटींपेक्षा अधिक वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेऊन काम करावे, अशा सूचना दिल्या.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मंगळवारी महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली. यात सुरुवातीलाच वसुली विभागाकडून आर्थिक वर्षात झालेल्या वसुलीची माहिती देण्यात आली. वर्षभरात ७२०६६ करदात्यांनी कर भरल्याने ८०.५८ कोटींच्या वसुलीची नोंद झाली. शास्तीमाफीमुळे १९.३९ कोटींची सवलत देण्यात आली. त्यामुळे ६१.१८ कोटी वसूल झाले आहेत. यापूर्वी सन २०२१-२०२२ मध्ये ५८.८२ कोटी, सन २०२२-२०२३ मध्ये ५७.५९ कोटी, सन २०२३-२०२४ मध्ये ५६.०९ कोटी रुपये वसुली झाली होती. यावर्षी सर्वाधिक ६१.१८ कोटी रुपये वसूल झाले आहेत. यात शास्तीमाफी योजनेमुळे १७.१८ कोटी वसूल झाले आहेत. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी विक्रमी वसुली केल्याबद्दल उपायुक्त प्रियांका शिंदे, वसुली विभागाचे प्रमुख व्ही. जी. जोशी, सर्व प्रभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बैठकीत कौतुक केले.
महानगरपालिकेच्या कर वसुलीमध्ये वर्षभरात ऑनलाईन कर भरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. वर्षभरात १५८३१ करदात्यांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरला आहे. एकूण वसुलीच्या तुलनेत ऑनलाईन कर भरणाऱ्यांचे प्रमाण २१.९६ टक्के आहे. नव्या आर्थिक वर्षापासून नवीन दरानुसार पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. तसेच, मालमत्तांचे सर्वेक्षण व पुनर्मूल्यांकन सुरू असून यामुळे अनेक नवीन मालमत्ता कराच्या कक्षेत येणार आहेत. मोजमापे अद्ययावत होणार असल्याने घरपट्टीची मागणीही आपोआप वाढणार आहे. त्यामुळे या नव्या आर्थिक वर्षात १०० कोटींपेक्षा अधिक वसुलीचे उद्दिष्ट ठेऊन काम करावे, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी बैठकीत दिल्या आहेत.
तसेच, महानगरपालिकेच्या मालकीच्या व सध्या भाडेकराराने देण्यात आलेल्या गाळ्यांचे भाडे, वर्ग खोल्यांचे भाडे याचीही वसुली मोठ्या प्रमाणात झाली आहे. सन २०२२-२०२३ मध्ये १.७६ कोटी, सन २०२३-२०२४ मध्ये २.२५ कोटी वसुली झाली होती. महानगरपालिकेने सन २०२४-२०२५ मध्ये सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मार्केट विभागाकडून वर्षभरात ५.९१ कोटी रुपये भाडे वसूल करण्यात आले आहे. मागील वर्षीपेक्षा दुप्पटहून अधिक वसुलीची नोंद झाल्याने आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मार्केट विभागाच्या कामाचेही कौतुक केले.
दरम्यान, कर वसुली हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. चांगली वसुली झाल्यास नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक बळकट करता येतील व अधिक चांगल्या सुविधा देता येतील. त्यामुळे मालमत्ताधारकांनी नियमित कर भरावा. नवीन वर्षातील कराची बिले वितरीत करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. ज्यांना बिले मिळाली नाहीत, त्यांनी प्रभाग समिती कार्यालयात जाऊन आपले कराचे बिल तपासून घ्यावे. एप्रिल महिन्यात संकलित करावर १० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.