अहिल्यानगर – उन्हाळा सुरू झाला असून पारा ३८ ते ३९ अंशावर पोहोचला आहे. या काळात उष्माघाताच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे उन्हाळ्यात काय करावे व काय करू नये, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच, नागरिकांनी उन्हात बाहेर पडणे शक्यतो टाळावे, व्यापारी संकुले, सार्वजनिक ठिकाणी संबंधित आस्थापनांनी पुरेशी सावली राहील, अशी व्यवस्था करावी. तसेच, लग्न समारंभ अथवा इतर कार्यक्रमात मोठ्या जेवणावळी असल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले आहेत.
वाढत्या तापमानाच्या व उष्माघाताच्या वाढलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपाययोजनांबाबत बैठक घेतली. यात व्यापारी संकुले, बस स्थानक, टॅक्सी, रिक्षा स्टँडवर पुरेशी सावली असेल अशी व्यवस्था करण्याबाबत संबंधित आस्थापनांना प्राधान्याने सूचना द्याव्यात. सार्वजनिक ठिकाणी थंड पाण्याची सोय करून पंखे, कूलर नादुरुस्त असल्यास दुरुस्त करावेत, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना द्याव्यात.

आरोग्य विभागाने उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीसाठी फलक लावावेत. नागरिकांनी काय करावे व काय टाळावे याची माहिती द्यावी. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उष्माघाताबाबत प्रथमोपचार पेट्या ठेवण्यात आल्या आहेत, याची खात्री करावी. सार्वजनिक ठिकाणी थंड पाण्याची सुविधा देण्यासाठी स्वयंसेवी, सामाजिक संस्थांना संपर्क करण्यात आला असून, त्याबाबत पाठपुरावा करून उपाययोजना कराव्यात. उन्हाळ्यात मोठ्या जेवणाचा कार्यक्रम असल्यास, लग्न, जागरण गोंधळ येथील जेवणाच्या कार्यक्यारामासाठी आरोग्य विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातून हे प्रमाणपत्र मिळेल. तशा सूचना संबंधितांना देण्यात याव्यात, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले.
तसेच, दुपारी रखरखत्या उन्हात उद्यानात जाऊ नये, अशा सूचना लावण्याबाबत उद्यान विभागाला सूचना द्याव्यात. दुपारी उद्याने बंद ठेवण्यात यावीत. रस्त्यावर पाणी शिंपडावे. आरोग्य केंद्रातील केबिनमध्ये उष्माघात कक्षाची तात्पुरती व्यवस्था करावी. जिल्हा रुग्णालयात उष्माघातावर उपचारासाठी स्वतंत्र टीम आहे. तेथील रुग्णवाहिकेचा क्रमांक केंद्रावर देण्यात आला आहे. ओआरएस देण्यात आले आहेत. रुग्ण आल्यास रुग्णवाहिकेशी संपर्क साधावा. दुपारच्या सत्रात मुलांच्या खेळाचे नियोजन करू नये. स्पर्धा घेऊ नयेत, अशा सूचना शाळांना देण्यात याव्यात, शाळांमध्ये परीक्षा सकाळच्या सत्रात घ्याव्यात. शाळांमधील पंखे चालू राहतील, याची काळजी घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्राने त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये भेटी देऊन शाळांमध्ये ओआरएस पाकिटे दिली आहेत, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
आशा वर्कर यांनी घरोघरी सर्वेक्षण करताना लहान मुले, कामावर जाणारे व्यक्ती, महिलांना उन्हात कामावर जाऊ नये, अशा सूचना द्याव्यात. नागरिकांनी घर थंड राहील, अशा उपाययोजना कराव्यात. दुपारच्या वेळेत १२ ते ३ या काळात कठोर परिश्रम टाळावेत, अनवाणी बाहेर जाऊ नये, अशाही सूचना द्याव्यात. आहारात फळे, सूप याचे प्रमाण वाढवावे, अधिक पाणी प्यावे, उन्हात बाहेर जाताना टोपी वापरावी, खिडक्यांना पडदे लावावेत, नागरिकांनी उन्हापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.