AMC News : अहिल्यानगर – राज्य शासन व जिल्हा नियोजन समितीकडून आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अहिल्यानगर शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. यातून सध्या शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्ता काँक्रीटीकरण करण्यावर महानगरपालिकेचा भर आहे.
त्यामुळे रस्ता करण्यापूर्वी अंतर्गत इतर कामे पूर्ण करून, अतिक्रमणे हटवूनच कामे केली जात आहेत. त्यासाठी रस्त्यांची मोजणी करून अतिक्रमणे काढण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याची मुदत संपल्यावर उर्वरित कामे सुरू होतील, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

रस्ते नागरिकांसाठी खुले करा
शहरातील रस्त्यांची सुरू असलेली कामे व सुरू करावयाच्या कामांचा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी शुक्रवारी आढावा घेतला. प्रगतीपथावर असलेली कामे तत्काळ पूर्ण करून रस्ते नागरिकांसाठी खुले करावेत, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिल्या.
रस्त्याची जागा मोकळी करा
ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू करायची आहेत, त्या ठिकाणी नगररचना विभागाने मोजमापे घेऊन खुणा करून दिल्या आहेत. त्यात असलेली अतिक्रमणे काढून घेण्यासाठी कार्यवाही सुरू करावी. ज्यांना नोटीसा बजावल्या आहेत, त्यांची मुदत संपली असल्यास तत्काळ कारवाई करून रस्त्याची जागा मोकळी करावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
प्राधान्याने मोजणी
नगररचना विभागाने बांधकाम विभागाशी समन्वय साधून ज्या रस्त्याचे काम सुरू केले जाणार आहे, तेथे प्राधान्याने मोजणी करून द्यावी. टप्प्याटप्प्याने कामे सुरू केली जात आहेत, त्यानुसार आवश्यक ठिकाणी मोजमापे घेऊन कार्यवाही करावी. अतिक्रमण निर्मूलन विभागानेही नोटीसांची मुदत संपतच तत्काळ रस्त्याची जागा मोकळी करून द्यावी.
नवीन कामे सुरू केली जाणार
सद्यस्थितीत सुरू असलेली रस्त्यांची कामे पूर्णत्वाला आली आहेत. त्यामुळे नवीन कामे सुरू केली जाणार आहेत. मोजणीअभावी सध्या कोणतीही कामे रखडलेली नाही. यापुढेही ती रखडणार नाही, याची दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी न्यायालयीन दावे, अडचणी असतील, त्याची माहिती तत्काळ द्यावी, जेणेकरून पुढील कार्यवाही करता येईल , असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.