दोन चार जणांमधील वाद अर्ध्या गावाला भोवला; धोंडेवाडी गाव होत्याचे नव्हते झाले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- तालुक्यातील धोंडेवाडी येथील गायरान जमिनीवर वसलेले गाव न्यायालयाच्या आदेशाने हटविण्यात आल्याने, तेथील शेतकऱ्यांना लग्न, मुलांचे शिक्षण आणि नवीन निवारा उभारण्याची काळजी वाटू लागली आहे.

गावातील दोन-चार जणांमधील वादाने गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविल्याने त्याचे परिणाम अर्ध्या गावाला भोगावे लागत आहे. असे धोंडेवाडी येथील शेतकरी म्हणाले आहेत. तसेच अर्धे गाव होत्याचे नव्हते झाले आहे. धोंडेवाडी गावातील निम्मी वस्ती ही गायराण जमीनीवर वसलेली होती.

परंतु घरे, टपर्‍या, दुकाने प्रशासनाने जमीनदोस्त केल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले झाले आहे. त्यात सुमारे ४०० लोकसंख्या असलेली १३५ घरे हटवली असून, आता राहायचे कुठे? हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. काहींनी शेजारी आसरा घेतला, काहींनी पाहुण्यांकडे, तर काहींनी शेतात राहोटी ठोकली आहे.

गेल्या अनेक वर्षापासुन हे सगळे येथे गुण्या गोवींदाने नांदत होती. मात्र गावातील पाझर तलावातील अधिग्रहीत जमीनीच्या विहीरी बाबतच वाद उद्भवला आणि या विहीरी बुजविण्याची मागणी जोर धरु लागली. त्यात राजकारणही घुसल्याने तो वाद काही दिवस चालुन अखेर विहीरी बुजल्या गेल्या.

पण याच वादादरम्यान धोंडेवाडीतील निम्मी घरेही गायराण जमीनीवर बांधली गेली असल्याने तीही काढावीत ही मागणी पुढे आली. यावर आधी हायकोर्टात नंतर सुप्रिम कोर्टात दावे दाखल झाले. यात न्यायालयाकडुन ही अतिक्रमणे काढण्यासंदर्भात संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीसही देण्यात आल्या होत्या.

आता कुठलाही पर्याय शिल्लक राहिला नसल्याने काही कुटुंबांनी स्वतःहून आपली अतिक्रमित घरे खाली केली, तर उर्वरित घरे प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात उध्वस्त केली. धोंडेवाडीत अर्ध्याच्यावर अतिक्रमण हटवल्यामुळे अर्धेगाव नामशेष झाले आहे. तिथे २-३ पिढ्यापासून राहत असलेल्या कुटुंबाला घरे मातीआड गेल्याने मोठे दुःख कोसळले आहे.

त्या कुटुंबातील शेतकऱ्यांना लग्न, मुलांचे शिक्षण आणि नवीन निवारा उभारण्याची काळजी वाटू लागली आहे. गावातील ४०० कुटुंबे उघड्यावर आल्याने या कुटुंबाने मोठी चिंता व्यक्त करत प्रशासनाकडे त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe