कोपरगावातील गोधेगाव शिवारात आकाशातून इलेक्ट्रिक यंत्र पडल्याने खळबळ

Ahmednagarlive24 office
Published:
electrik yantr

कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव शिवारातील एका शेतात आकाशातून पांढऱ्या रंगाचे चौकोनी आकाराचे व छत्री सारखे असलेले इलेक्ट्रिक यंत्र पडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु, अधिक माहिती घेतली असता हवामान मोजमाप यंत्र असल्याचा प्राथमिक अंदाज उपस्थितांनी व्यक्त केला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गोधेगाव शिवारातील शेतकरी सतीश राजेंद्र पठाडे यांच्या शेतात मंगळवारी (दि.९) दुपारच्या सुमारास थेट आकाशातून पांढऱ्या रंगाचे अज्ञात इलेक्ट्रिकल यंत्र पडलेले असल्यास आढळून आले.

सदर यंत्र बघून शेतकरी चांगलेच घाबरले होते. प्रारंभी ती धोकादायक वस्तू असल्याचे त्यांना वाटल्याने ते बराच वेळ ते यंत्रापासून दूर होते. मात्र त्यांनी थोडी हिम्मत करून ते यंत्र हातात घेऊन त्या यंत्राचे स्विच ऑफ केले.

सध्याचे अनेक तरुण शेतकरी हे सुशिक्षित असल्याने त्यांनी सदर यंत्राबाबतची माहिती मोबाईलवर सर्च केली असता, ते यंत्र हवामान विभागाशी संबंधित असून ते हवामानाचे मोजमाप करण्यासाठी वापरात येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. ते यंत्र नादुरुस्त झाल्यामुळे कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर यंत्राबाबत त्यांनी गावातील वरिष्ठांना कळवले आहे. मात्र या यंत्रामुळे गोधेगाव शिवारात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

याबाबत शेतकरी पठाडे यांनी सांगितले की, अचानक अवकाशातून येताना एक वस्तू दिसली. तिला बलून वगैरे होता आणि छोटीशी वस्तू होती आणि त्या वस्तूवर मेड इन कोरिया, अशा प्रकारचे लिहिलेले होते आणि इतर भाषेतला मजकूर होता. तो आम्ही गुगलवर स्कॅन करून बघितला. तर त्यामध्ये ते हवामान संबंधित काहीतरी यंत्र असल्याचे माहिती उपलब्ध झाली.

नागरिकांना अशा प्रकारे कोणतीही अनोखे यंत्र साहित्य दिसून आढळून आल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय त्यापासून दूर राहण्यास गरजेचे आहे. जेणेकरून त्यापासून आपणास काही धोका असल्यास त्यापासून आपण बचावले जाऊ शकतो. अशाच प्रकारचे व आकाराचे यंत्र वैजापूर शिवारातही काही दिवसांपूर्वी पडले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe