अहिल्यानगरच्या अभियंत्याचा महाबळेश्वरमध्ये डंका

Karuna Gaikwad
Published:

११ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : महाबळेश्वर पासून केवळ ५ किलोमीटर अलिकडे असलेल्या पण पर्यटन व विकासापासून वंचित असलेल्या मेटगुताड या गावाचा कायापालट अहिल्यानगरच्या एका अभियंत्याने केला. त्या गावाला पर्यटनाच्या नकाशावर झळकावले. मेटगुताडला लाभलेल्या नैसर्गिक सौंदर्याकडे अद्याप सर्वांचे दुर्लक्ष होते.निसर्गाची कोणतीही मोडतोड न करता नव्या साईट तयार करून गावाचा कायापालट केला.

नगरच्या सुहास मुळे यांनी अत्यल्प खर्चात हा उपक्रम करून दाखवला आहे. अभियंते मुळे यांची महाबळेश्वर मेटगुताड विकास समितीवर सल्लागार सदस्य म्हणून निवड झाल्यावर त्यांनी दुर्लक्षित असलेल्या पण निसर्ग संपदा लाभलेल्या जागा निवडून त्या ठिकाणी नंदनवन फुलवण्याचे काम केवळ एका वर्षांत करून दाखवले. ज्या गावातून रोजचे हजारो पर्यटक जात होते पण कोणीही त्या गावात थांबत नसे.

पण सुहास मुळे यांनी केलेल्या कायापालट मुळे आता रोज शेकडो पर्यटक मेटगुताड मध्ये थांबून या नव्या पॉईट व साईटचा आनंद घेत आहे.त्यामुळे भरघोस उत्पन्नाचे साधन मेटगुताड ग्रामपंचायतीला सुरु झाले आहे.नगरचे अभियंते सुहास मुळे यांनी महाबळेश्वरमध्ये जाऊन आपला कौशल्याचा व बुद्धिमत्तेचा डंका वाजवला आहे.याबद्दल हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुहास मुळे यांचा मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

गावाच्या जत्रे निमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री मकरंद पाटील यांनी सुहास मुळे यांच्या या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.सुहास मुळे यांना या कामासाठी मेटगुताड गावाचे सरपंच महादेव ओंबळे, व सर्व सदस्य, तसेच कायनेटिक कंपनीचे संचालक अजिंक्य फिरोदिया, पद्मश्री अरुण फिरोदिया, जयश्री फिरोदिया, व्यवस्थापक गुळवे यांनी सहकार्य केले.यावेळी नगरहून प्रकाश शिंदे, सुनील कुलकर्णी. योगेश गणगले उपस्थित होते.

मुळे म्हणाले, महाबळेश्वरच्या विकास समितीवर सल्लागार सदस्य म्हणून माझी निवड झाल्यावर त्या भागाचा विकास करण्याचा चंग मी बांधला. महाबळेश्वर भागातील विविध भागांमध्ये फिरून नव्या साईटच्या निर्मितीसाठी शोध घेतला. मेटगुताड हे महाबळेश्वर पासून केवळ ५ किलोमीटर अलिकडे अगदी रस्त्यावर असूनही दुर्लक्षित होते.भरपूर निसर्ग संपदा लाभलेल्या त्या गावाची निवड करत मेटगुताड गावाचा कायापालट करण्यासाठी काम सुरु केले.

सर्वप्रथम ग्रामदैवत कुंभळजाई देवी मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर करून एखाद्या तीर्थक्षेत्राला लाजवेल इतका सुंदर आणि निसर्गरम्य विकसित झाला आहे. संपूर्ण परिसर सोलर लाईट मुळे उजळून निघाला आहे. तसेच लिंगमळा येथील अमरधाम परिसर दुर्गंधीयुक्त कचरायुक्त आणि अतिशय दुर्लक्षित होता. तिथे जवळच वाहणाऱ्या बंधारा घालून छोटासा स्वच्छ तलाव तयार केला.

त्यावर विहार करण्यासाठी प्रदुषण विरहित नवीन प्रकारच्या पायडल बोट देखील उपलब्ध झाल्या आहेत. छोटे छोटे धबधबे सुरक्षित करून पर्यटकांना त्याखाली बसण्याची देखील व्यवस्था केली आहे. सर्व बाजूंनी डोंगर दरीने वेढलेला हा परिसर आज नंदनवन वाटत आहे. पावसाळ्यात तर हे दृश्य इतके निसर्गरम्य असते की जणू काही आपण स्वित्झर्लंडमध्ये आलो आहोत की काय असे वाटते.

बाजूच्या दरीवर रोपवे उभारून त्याचाही आनंद पर्यटकांना घेता येतो आहे. एका उंच टोकावर एक सेल्फी पॉईंट तयार केला असून त्याला जयश्री फिरोदिया सेल्फी पॉईंट असे नाव देण्यात आले आहे. तिथे तीनशे फूट उंचीवरून प्रचंड मोठा लिंगमळा धबधबा कोसळतानाचे दृश्य खूप विहंगम असते. नगरच्या पर्यटकांनी या नव्या साईटचा आनंद घेण्यासाठी एकदा मेटगुताडला जावेच,असे आवाहन सुहास मुळे यांनी केले आहे.

मुळे म्हणाले, पिकते तिथे विकत नाही या म्हणीचा अनुभव आपल्याला नेहमी येत असतो. आपल्या अहिल्यानगरमधे हा दृष्टिकोन आणि बुद्धिमत्ता असलेल्या प्रामाणिक कार्यक्षम व्यक्ती उपलब्ध आहेत. तसेच निधी व डेव्हलप करण्यासाठी जागाही उपलब्ध आहेत.लोकप्रतिनिधींचा आणि नागरिकांची मानसिकता आणि इच्छाशक्ती नसल्यामुळे असा विकास आपल्या नगरमध्ये होऊ शकत नाही. नुसत्या कोटीच्या कोटी रुपयांच्या घोषणा होतात. ऐतिहासिक शहर हा कुठलाही नेत्र दीपक पर्यटकांना आकर्षित करणारा विकास न होता फक्त खंडहर ऐतिहासिकच राहते अशी खंत व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe