Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथील ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रियेनंतर नवीन जीवन मिळालेली चिमुरडी जयश्री आमदार मोनिका राजळे यांच्या कुशीत झेपावली अन् उपस्थितांचे डोळे पाणावले. महिला दिनी (शुक्रवारी) आमदार राजळे यांनी तिची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या स्मृती दिनानिमित्तच्या महाआरोग्य शिबिरामार्फत तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. जन्मल्यानंतर केवळ ३५ दिवसांचीच असताना हृदयाला छिद्र असल्याचे अतीव दुःख क्षेत्र हनुमान टाकळी (ता. पाथडी) येथील जयश्री गोरक्ष बडे, या चिमुरडीच्या नशिबी आले.
तिच्या माता-पित्यांनी अहमदनगर, पुणे येथील दवाखान्यात चिकित्सा केली. सांगितलेल्या शस्त्रक्रियेचा खर्च ऐकून त्यांचे डोळेच विस्फारले. आता जयश्री बर्डे हिच्या शस्त्रक्रियेनंतर आमदार मोनिका राजळे यांनी हनुमान टाकळी (ता. पायडर्डी) येथे जाऊन तिच्या तब्येतीबाबत विचारपूस केली.
पैशांची जमवाजमव करण्याचे मोठे आव्हान, नातेवाईकांकडे उसणवारी, अशा गर्तेत स्व. माजी आमदार राजीव राजळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिर हा त्यांना आशेचा किरण दिसला. शिबिरात चिकित्सा होऊन मुंबई येथील रुग्णालयात डॉ. प्रदीप कौशिक यांनी २८ फेब्रुवारीला ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया केली.
त्यानंतर जयश्रीचे हृदय नियमित कार्य करू लागले. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार मोनिका राजळे यांची गाडी अचानकच बडे परिवाराच्या शेतवस्तीवर पोहोचली. त्यावेळी जयश्रीचे हे वास्तव सार्वत्रिक झाले. शत्रक्रिया व त्या पश्चातच्या अंतिम तपासणीचे लेखी विवरण पाहून आमदार राजळे निश्चित झाल्या. कुतुहलाने जयश्रीला जवळ घेण्यासाठी हात करताच ती आवाज करीत ओळख नसतानाही त्यांच्या कुशीत झेपावली अन् उपस्थितांचे डोळे पाणावले. आभारासाठी आजोबा संभाजी बर्डे यांनी पायाकडे झुकविलेली मान पाहताच आमदार मोनिका राजळे यांनी हा ईश्वरीय संकेत आहे. त्याचेच आभार मानायला हवेत, असा निर्वाळा दिला.