Ladki Bahin Yojana : अहिल्यानगरातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात. परंतु, अनेक अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अशा महिलांना योजनेतून वगळण्यासाठी अर्जांची छाननी सुरू झाली आहे. यासाठी काही ठराविक निकष ठरविण्यात आले आहेत.
सरकारने चारचाकी वाहन असलेल्या लाभार्थ्यांना स्वेच्छेने योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. मात्र, याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर यात काही त्रुटी आढळल्या तर संबंधितांचा लाभ रद्द केला जाईल.

जिल्ह्यात १२ लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता. यापैकी २५० ते ३०० महिलांनी स्वतःहून लाभ नाकारला आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी असूनही, उच्च उत्पन्न असलेल्या आणि आयकर भरणाऱ्या महिलाही याचा लाभ घेत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आता अर्जांची कसून पडताळणी होणार आहे.
या महिलांना लाभ मिळणार नाही
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरात जर चारचाकी वाहन असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. लवकरच अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन चारचाकी वाहनांची तपासणी करतील.
तसेच, लाभार्थी महिलेच्या नावावर ५ एकरांपेक्षा जास्त शेती असल्यास किंवा ती शासकीय नोकरीत असेल, तर ती या योजनेसाठी अपात्र ठरेल. विशेषतः चारचाकी वाहन असलेल्या महिलांना प्राधान्याने योजनेतून वगळले जाईल.
नगर जिल्ह्यात २० हजारांहून अधिक अर्ज तपासणार
महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त अर्जांपैकी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे का, हे तपासण्यासाठी लवकरच मोहीम सुरू होणार आहे.
याबाबत वरिष्ठांकडून सूचना मिळाल्या असून, आरटीओकडून मिळालेली यादी अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील २० हजारांहून अधिक महिलांची तपासणी होणार आहे.