AhmednagarLive24 : लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्याविरोधात पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
मात्र, सोमनाथ काशिद या सामाजिक कार्यकर्त्याने हजारे यांच्या विरोधातच एक जून रोजी राळेगणसिद्धीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.जनता महागाईने होरपळत असताना गप्प कसे? असा सवाल काशिद यांनी विचारला आहे.
लोकांच्या प्रश्नांसाठी कायम आंदोलनं, उपोषणं करणारे अण्णा हजारे महागाईच्या प्रश्नावर मूक गिळून गप्प का आहेत? महागाईच्या मुद्द्यावर अण्णा हजारेंना जागे करण्यासाठी येत्या १ जून रोजी झोपी गेलेल्या अण्णा हजारेंना उठवण्यासाठी ‘अण्णा उठो’ आंदोलन करणार असल्याचे काशिद यांनी म्हटले आहे.
हजारे यांच्या गावी म्हणजेच राळेगणसिद्धीमध्ये हे आंदोलन करण्याचा इशारा त्यांना दिला आहे. हजारेंनी जनतेसाठी महागाईविरोधात जनआंदोलन सुरू करण्याची गरज असल्याने हे आंदोलन आपण करीत असल्याचे काशिद यांनी म्हटले आहे.
काशिद यांनी प्रसारमाध्यमांच्या मार्फत हा इशारा दिला आहे. मात्र, काशिद कोण आहेत? यासंबंधी राळेगणसिद्धी येथे काहीही माहिती नाही. तसेच त्यांनी यासंबंधी हजारे यांच्या कार्यालयाशी अद्याप काहीही पत्र व्यवहार केलेला नाही, अशी माहिती मिळाली.