राहुरी- 26 मार्च हा राहुरीच्या इतिहासातील एक काळा दिवस ठरला, जेव्हा महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाली. या प्रकरणातील आरोपी निश्चित झाले असल्याची माहिती आहे, परंतु पोलिस त्यांची नावे जाहीर करत नाहीत, असा आरोप मराठा एकीकरण समितीने केला आहे.
या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवावा आणि 10 दिवसांत आरोपींची नावे जाहीर करावीत, अशी मागणी समितीने लावून धरली आहे. तसे न झाल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, देवळाली प्रवरातील 19 तरुणांवर दाखल झालेले चुकीचे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणीही समितीने केली आहे.

पोलिस ठाण्यासमोर आंदोलन
मराठा एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (10 एप्रिल) दुपारी राहुरी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
आंदोलनात माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम, मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे, संभाजी ब्रिगेडचे गोरख दळवी, भाजप तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, श्यामराव निमसे, विक्रम तांबे, शिवाजी सागर, ओंकार खेवरे, बाळासाहेब उंडे, कांता कदम, नितीन पटारे, गोरख मुसमाडे, सचिन म्हसे, सुधाकर कदम, अशोक शेटे, रवींद्र म्हसे, सचिन ढुस, प्रकाश संसारे, राजेंद्र लोंढे, अमित पाटील, शहाजी कदम, माउली वाणी, नारायण धोंगडे, बाळासाहेब लोखंडे, प्रशांत मुसमाडे, विशाल मुसमाडे, अमोल कदम, अनंत कदम, जयेश मुसमाडे, नितीन देशमुख, दत्तात्रय म्हसे, संदीप आढाव, सागर खांदे, सतीश वने, अनिल चव्हाण, मधुकर घाडगे, कैलास बानकर, हरीश वाळुंज, सुधीर पठारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी
मराठा एकीकरण समितीने देवळाली प्रवरातील 19 तरुणांवर दाखल झालेले गुन्हे खोटे असल्याचा दावा केला आहे आणि हे गुन्हे त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. याबाबतची ठोस भूमिका बुधवारी झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आली होती.
राहुरी येथे आंदोलन सुरू असताना, देवळाली प्रवरात व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. समितीने पोलिस प्रशासनाला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, अन्यथा व्यापक आंदोलनाची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.