अहिल्यानगर: प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत अनुदान वितरणात अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. चालू वर्षात जिल्ह्यात 501 नवीन अन्न प्रक्रिया उद्योग स्थापन झाले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला आहे.
पुण्यातील बालेवाडी येथे बुधवारी (9 एप्रिल) आयोजित राज्यस्तरीय कृषी अधिकारी कार्यशाळेत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाला प्रधान सचिव विकास रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, आणि कृषी संचालक विजयकुमार आवटेयांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यात सूरू झालेले उद्योग
या योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत 1435 अन्न प्रक्रिया उद्योग कार्यान्वित झाले आहेत. यामध्ये खालील क्षेत्रांचा समावेश आहे:
दुग्धजन्य पदार्थ- 390 उद्योग
फळे व भाजीपाला प्रक्रिया- 427 उद्योग
कडधान्य प्रक्रिया-130 उद्योग
पशुखाद्य प्रक्रिया-71 उद्योग
तेलबिया प्रक्रिया- 55 उद्योग
बेकरी उत्पादने- 55 उद्योग
प्रयत्नांना यश
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग, बँका, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक आणि जिल्हा संसाधन व्यक्तींनी एकजुटीने काम केले. या सामूहिक प्रयत्नांमुळे अहिल्यानगरने हे यश मिळवले, असे सुधाकर बोराळे यांनी नमूद केले.
अनुदानाचे वितरण
या योजनेअंतर्गत प्रत्येक प्रकल्पासाठी 11 लाख रुपये कर्ज आणि 6 लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. यावर्षी जिल्ह्यात 20 कोटी रुपये अनुदान अन्न प्रक्रिया उद्योगांना वितरित झाले असून, एकूण 90 कोटी रुपये अनुदान वितरणाचा टप्पा गाठला गेला आहे, अशी माहिती राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
भविष्यातील योजना
कृषी विभागाला अधिक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेण्याचे आणि पिकांच्या मूल्यसाखळीचा विकास साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे विखे-पाटील यांनी अधोरेखित केले.