Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील लाल टाकी परिसरातील प्रसिद्ध ‘अप्पू’ हत्तीचा पुतळा अखेर महापालिकेने हटवला आहे. चौकातील रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने हा पुतळा हलवण्यात आला आहे.
मात्र, नागरिकांमध्ये याबाबत नाराजी असून, काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा याच ठिकाणी हत्ती शिल्प बसवण्याची मागणी केली जात आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले की, पुतळा कायमस्वरूपी हटवण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही.

१९८२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने ‘अप्पू’ हत्तीचा पुतळा चौकात बसवला होता. तेव्हापासून हा चौक ‘अप्पू हत्ती चौक’ म्हणून ओळखला जातो.वर्षानुवर्षे हा पुतळा स्थानिक नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. काही वर्षांपूर्वी चौकाच्या सुशोभीकरणाच्या वेळीही हा पुतळा हटवण्यात आला होता. मात्र, स्थानिकांच्या मागणीनंतर तो पुन्हा चौकात बसवण्यात आला होता.
आता या ठिकाणी रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने पुन्हा एकदा हा पुतळा हलवण्यात आला आहे. महापालिकेने स्पष्ट केले आहे की, काम पूर्ण झाल्यानंतर चौकाचे सुशोभीकरण केले जाणार आहे.
मात्र, ‘अप्पू’ हत्तीचा पुतळा पुन्हा बसवला जाईल का, याबाबत महापालिकेने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गाने पुतळा पुन्हा बसवण्याची जोरदार मागणी केली आहे.
‘अप्पू’ हत्ती चौकाची ओळख जपण्यासाठी आणि ऐतिहासिक वारसा कायम ठेवण्यासाठी महापालिकेने नागरिकांच्या भावनांचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी स्थानिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.