Ahmednagar News : उन्हाळ्यात वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होऊ नये, म्हणून वन्यजीव विभाग सरसावले आहे. भंडारदऱ्याच्या कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात वन्यजीव विभागाकडून पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
काही ठिकाणी कृत्रीम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. तर नैसर्गिक असणाऱ्या पाणवठ्यांचीही स्वच्छता करण्यात आली आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा हा सह्याद्रीच्या कुशीत लपलेला असून भंडारदऱ्याच्या शेजारीच कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्य सुरु होते. या अभयारण्यात विविध प्रकारचे पशुपक्षी आढळुन येतात. मार्च संपला की उन्हाळ्याची चाहुल सुरु होते.
पाण्याचे स्त्रोत कमी होऊ लागतात. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची वणवण तर पशुपक्षांची भटकंती सुरु होते. भंडारदरा धरणाच्या पाणलोटातही अशीच अवस्था होते. चार महिणे या पाणलोटात भरभरुन पाऊस पडतो. अफाट पाणी वाहुन जाते.
चढ-उताराची जमीन असल्याने जमिन पाणी धरुन राहत नाही. चार महिने पशुपक्षांसाठी अगदी आरामात जातात. थंडीच्या कालावधीतही पशुपक्षांना पाण्याची कमरता जाणवत नाही. मात्र जस, जसा उन्हाळा सुरु होईल, तस-तसा पाण्यासाठी पशुपक्षांची भटकंती सुरु होते.
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात आजच्या घडीला सुर्य आग ओकत आहे. उन्हाने अंगाची लाहीलाही होत आहे. उष्णतेचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. पाण्याचे स्रोतही कमी होऊ लागले आहे. त्यामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
ही वन्यजीवांची भटकंती थांबविण्यासाठी वन्यजीव विभागाने बऱ्याच ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत. काही नैसर्गिक असणारे पाणवठेही वन्यजीव विभागाकडून स्वच्छ करण्यात आले आहेत. कृत्रीम तयार केलेल्या पाणवठ्यामध्ये पाणी कमी पडणार नाही, याची काळजी वन्यजीव विभागाकडून घेतली जात आहे.
घाटघरचे वाघ तळे, हिवाळा नाल्यातील हिवरदरा तसेच साम्रद, रतनवाडी, कोलटेंभे, पांजरे या गावांच्या हद्दीत असणाऱ्या अभयारण्यात वन्यजीव विभागाकडून पाणवठे उभारले गेले आहे. हरिश्चंद्रगडाच्या परिसरातील वन्यजीवांसाठी पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पशुपक्षांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागु नये, यासाठी वन्यजीव विभागाकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात भेकरे, वनगायी, मोर, तरस, वानर, माकड,
बिबट्या व इतर प्रकारची पशुपक्षी असून या वन्यजीवांना पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, दत्तात्रय पडवळे, वनपाल भास्कर मुठे, शंकर लांडे, रघुनाथ कुवर, वनकर्मचारी चंद्रकांत तळपाडे, महिंद्रा पाटील, प्रविण साळुंखे, संदिप पिचड, अनिता शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.