१४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : १५ व्या वित्त आयोगाचा १६ लाख ५० हजार रुपयांचा निधी अपहार प्रकरणी अटकेत असलेले महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी तथा डॉ. अनिल बोरगे व लेखाव्यवस्थापक विजयकुमार रणदिवे यांना कोर्टाने १७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.श्री. बोरगे व रणदिवे यांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.१२) गुन्हा दाखल होवून त्यांना अटक करण्यात आली होती. बोरगे व रणदिवे यांना गुरुवारी (दि.१३) कोर्टात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
कोर्ट नं. ६ चे न्यायाधिश व्ही. बी. शेट्टी यांच्या समोर बोरगे व रणदिवे यांना हजर करण्यात आले होते. न्यायाधिश शेट्टी यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्या नंतर बोरगे व रणदिवे यांना पोलिस कोठडी ठोठावली आहे. बोरगे व रणदिवसे यांच्या वतीने अॅड. सुधीर बाफना यांनी काम पाहिले डॉ. बोरगे यांची बाजू मांडताना अॅड. बाफना म्हणाले की, त्यांच्या विरुद्धचा कुठलाही पुरावा नाही.

केवळ राजकीय हेतूपोटी त्यांना चुकीच्या गुन्ह्यात अडकविण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. यादव यांनी प्रभावीपणे युक्तीवाद केला. त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत कोर्टाने बोरगे व रणदिवे यांना १७ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, डॉ. बोरगे व रणदिवे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल होवून त्यांना अटक झाल्याने हा नगरकरांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.
मनपाचे प्रभारी आरोग्य अधिकारी अॅड. सतिश राजूरकर यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्ह्याची नोंद करून बोरगे व रणदिवे यांना बुधवारी रात्री अटक केली आहे. बुधवारी दुपारनंतर बोरगे व रणदिवे यांना कोतवाली पोलिस ठाण्यात बोलावून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. श्री. राजूरकर हेही कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी दिवसभर तळ ठोकून होते. दरम्यान, डॉ. बोरगे हे सातत्याने वादग्रस्त ठरले आहे. या पूर्वीही ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.मनपाचे आयुक्त यशवंत डांगे यांनी बोरगे यांच्यावर कारवाई केली होती.