Ahmednagar News : महाराष्ट्रात सध्या अजित पवार गट सत्तेत आहे. अजित पवार गटात गेलेल्या अहमदनगरमधील अकोले येथील आमदार किरण लहामटे यांनी ग्रामस्थांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.
ग्रामस्थांनी विकासकामांबाबत तक्रार करताच हरामखोरांनो, तुम्ही माझा आजचा दिवस खराब घातला…असे वक्तव्य त्यांनी केले आहे.मंगळवारी (१० जानेवारी) सकाळी ९ वाजता त्यांच्या मतदारसंघात विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली आहे.
अधिक माहिती अशी : अकोले तालुक्यातील माणिकओझर गावकऱ्यांनी गावातील निकृष्ट गटाराच्या कामाची तक्रार आमदारांकडे केली. १४ वित्त आयोगातील पिण्याच्या पाणी योजनेची टाकी होऊन सहा वर्ष लोटले, ठेकेदाराने काम पूर्णत्वाचा दाखला घेऊन निधीही लाटला, पण अद्याप टाकीत थेंबभरही पाणी आले नाही.
गावकऱ्यांच्या या तक्रारीवरून उद्विग्न झालेल्या आमदार डॉ. लहामटे यांनी माणिकओझर गावकऱ्यांबद्दल अनुद्गार काढले, यावर गावकरी आक्रमक झाले. त्यामुळे प्रसंगावधान राखून आमदार डॉ. लहामटे यांनी त्वरित पीएकरवी गाडी बोलावून तेथून काढता पाय घेतला.
तेच ठेकेदार भूमिपूजन कार्यक्रमात
अकोले तालुक्यातील माणिकओझर गावाची कारभारीवस्ती ते वीज डीपी रस्त्याचे डांबरीकरण व गावात पेव्हरब्लॉक बसवणे या ८ लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार डॉ. लहामटे यांच्या हस्ते होणार होते. भूमिपूजन कार्यक्रमात गावकऱ्यांनी गावातील निकृष्ट गटाराच्या चौकशीची मागणी आमदारांकडे केली.
विशेष म्हणजे ज्या ठेकेदारांने गटाराचे निकृष्ट काम केले तेच ठेकेदार भूमिपूजन कार्यक्रमात हजर होते. यावरून ही कामेही त्याच ठेकेदारांकडून करण्यात येणार होते. यामुळे ग्रामस्थांनी गावात याच ठेकेदारांकडून बांधकाम केलेल्या निकृष्ट गटार कामची तक्रार आमदारांकडे केली होती.
ग्रामस्थ काय म्हणतात ?
येथील एका ग्रामस्थाने सांगितले की, मी २०१९ च्या निवडणुकीत डॉ. किरण लहामटे यांना आमदार करण्यास स्वतःचे पैसे खर्च केले. मी त्यांना माणिक ओझर गावातील ग्रामस्थांची तक्रार सांगितली. त्यावर आमदारांनी ग्रामस्थांनाच शिवीगाळ केली. लोकप्रतिनिधींकडून हे अपेक्षित नसून आम्ही तक्रार कोणाकडे करायची असा सवाल ग्रामस्थांनी केला.