Ahmednagar News : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे गाडीतून उतरता उतरता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना भेटले व त्यांना विचारलं की, “काय रे बाबा तू जागेवर आहेस ना?” त्यावर प्राजक्त तनपुरे म्हणाले, “हो मी जागेवरच आहे.”
“प्राजक्त माझ्या मंत्रिमंडळात होते, तुमचे मामा जयंत पाटील जागेवरच आहेत. सगळे जागेवरच आहेत. मुळात तुमच्यासारखे मर्द मावळे जागेवर पाय रोवून असताना आपल्याला दिल्लीची पर्वा नाही”, असे विचार ठाकरे शिवसेनेचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुरी येथे मांडले.
काल दुपारी रखरखत्या उन्हात ठाकरे यांनी काल मंगळवारी राहुरीचा धावता दौरा केला. नगर- मनमाड रस्त्याने श्रीरामपूरकडे जात असताना राहुरी बाजार समितीच्या प्रवेश द्वाराजवळ ठाकरे यांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला.
यावेळी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा शिवसेना प्रमुख रावसाहेब खेवरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, तालुकाप्रमुख सचिन म्हसे, शहर प्रमुख डॉ. संजय म्हसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, की अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. कोणतेही निमित्त नाही. मी तर फिरतोय माझ्या कुटुंबाशी संवाद साधायला. तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहात. भाजपला जे काही वाटतंय की मोठमोठे भ्रष्ट नेते फोडले, म्हणजे महाराष्ट्रातील मैदान मोकळे आहे, त्यांना माहिती नाही की या मैदानामध्ये गवतालासुद्धा भाल्याचे पाते फुटतात. असा हा महाराष्ट्र आहे.
तत्पूर्वी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचेही भाषण झाले. उपसभापती गोरक्षनाथ पवार, जिल्ह उपप्रमुख भागवत मुंगसे, त्यांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष अनिल कासार त्यांचे सर्व सहकारी, पंचायत समितीचे सर्व माजी सदस्य, डॉ. संजय म्हसे उपस्थित होते.