Ahmednagar News : सासरी गेलेली पत्नी नांदायला परत येत नसल्याने रागाने बेभान झालेल्या पतीने पत्नीच्या भावाचा तीन वर्षाच्या मुलाला नायगाव येथे जाऊन घरासमोर खेळत असताना उचलून आणले होते. दरम्यान मेहुण्याच्याच तीन वर्षीय बालकाचा खून करून मृतदेह आतेमामाने गारज (ता. वैजापूर) शिवारात फेकून दिल्याचे समोर आले आहे.
दरम्यान श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने नशेत मृतदेह फेकल्याने त्याला नेमके ठिकाण सांगता येत नव्हते. मागील आठ दिवसापासून शिऊर पोलीस बालकाच्या मृतदेहाचा कसोशीने शोध घेत होते.
स्नेहदिप ऊर्फ पिल्या अभिजित त्रिभूवन (वय ३) असे खून झालेल्या बालकाचे नाव असून त्याचाच आतेमामा असलेल्या राहुल पोपट बोधक (रा. चांडगाव ता. वैजापूर) याने त्याच्या नायगाव येथून घरासमोरून उचलून नेत त्याचा गळा दाबून निर्दयीपणे खून करून मृतदेह गारजपासून दीड किमी अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या गट नंबर ६७ मध्ये मक्याच्या शेतात अंधारात फेकून दिला होता.
ही घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती. बालकाची आई सुश्मिता अभिजित त्रिभुवन (रा. नायगाव ता. श्रीरामपुर) यांनी श्रीरामपूर ग्रामीण पोलिसांत आरोपी राहुल बोधक याच्या विरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार श्रीरामपूर ग्रामीण पोलिसांनी आरोपी राहुल बोधक याला ताब्यात घेत चौकशी केली असता आरोपी दारूच्या नशेत तरं असताना शिऊर बंगला परिसरात स्नेहदीप याचा खून करून मृतदेह मक्याच्या शेतात फेकुन दिल्याचे सांगितले होते.
त्यानुसार श्रीरामपुर पोलिसांनी शिऊर पोलिसांच्या मदतीने शिऊर बंगला परिसरासह भटाना, साकेगाव शिवारातील रस्त्यालगत असलेले सर्व मक्याचे शेत पालथे घालत शोध मोहीम राबवली होती.
मात्र बालकाचा मृतदेह सापडला नव्हता; मात्र काल शुक्रवारी (दि.१३) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गारज शिवारातील शेतकरी कचरु तुपे यांना त्यांच्या शेतात दुर्गंधी आल्याने त्यांनी पाहिले असता मक्याच्या शेतात बालकाचा मृतदेह असल्याची माहिती शेतकऱ्याने शिऊर पोलिसांना दिली.