मागितले ‘रेशन’ अन मिळाला ‘मार’; या तालुक्यातील प्रकार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- मागील महिन्याचे धान्य मागितले, म्हणून स्वस्त धान्य दुकानदाराला त्याचा राग आला व कामगारासह त्याच्या भावाने एका व्यक्तीस जबर मारहाण केल्याची घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे.

या प्रकरणी पाथर्डी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील स्वस्त धान्य दुकानाचे वाटप सातवड येथील बाबासाहेब पाठक यांच्याकडे आहे.

देवराईचे नागरिक सातवडला जाऊन तिथून आपल्या हक्काचे स्वस्त धान्य घेऊन येतात. देवराईचे अनिल शिवराम पालवे वय (वर्षे ४९) हे शुक्रवार दि.२२ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता स्वस्त धान्य दुकानदाराकडे धान्य आणण्यासाठी गेले असता त्यांना चालू महिन्याचे धान्य देण्यात आले.

त्यानंतर पालवे यांनी मागील महिन्याचे धान्य आम्हाला मिळालेले नाही ते देखील देण्याची मागणी दुकान चालकाकडे केली. त्याचा राग येऊन महेश दत्तात्रय पाठक व त्याचा भाऊ ऋषिकेश पाठक यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद पालवे यांनी पोलिसात दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe