देवळाली प्रवरा: विद्यार्थ्यांना अवजड कपाट हलवण्यास सांगितल्याच्या प्रकरणी केंद्रप्रमुख निलीमा गायकवाड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांची एक वेतनवाढ रोखण्याचा आदेश दिला आहे.

काय आहे प्रकरण?
लोकसभा निवडणुकीदरम्यान देवळाली प्रवरा जिल्हा परिषद शाळेत अवजड साहित्यासह कपाट हलवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना हे कपाट हलवण्यास सांगण्यात आल्याचा आरोप झाला. या घटनेची छायाचित्रे राजेंद्र उंडे यांनी राष्ट्रीय बाल हक्क व संरक्षण आयोग (नवी दिल्ली) यांच्याकडे पाठवत तक्रार केली.
तक्रारीनंतर जिल्हा परिषद प्रशासनाने गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. केंद्रप्रमुख निलीमा गायकवाड यांना खुलासा देण्यास सांगण्यात आले. गायकवाड यांनी तक्रारदार उंडे यांनी वैफल्यग्रस्त होऊन ही तक्रार दिल्याचा दावा केला. त्यांनी मजूर उपलब्ध असल्याचे आणि त्यांना मजुरी अदा केल्याचे सांगितले. विद्यार्थी केवळ कुतूहलाने जमा झाले होते, त्यांचे फोटो चुकीच्या हेतूने सादर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गायकवाड यांचा खुलासा अमान्य केला आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. “राष्ट्रीय बाल हक्क व संरक्षण आयोगाच्या आदेशानुसार केंद्रप्रमुखांनी कामकाजात कसूर केली आहे. त्यानुसार कारवाई करून अहवाल सादर करण्यात येईल. असे राहूरी गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंभारे यांनी सांगितले.
या प्रकरणामुळे शालेय व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शिक्षक-प्रशासनाच्या वादात विद्यार्थ्यांना मध्येच ओढले जात असल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे. पुढे यात आणखी काय कारवाई होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.













