Ahmednagar News : मढी येथे पशुहत्या करण्याच्या उद्देशाने आलेल्या चार जणांना देवस्थान समितीचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी पशु हत्या करू नका, असे समजावून सांगत असताना त्यांच्यावर चौघांनी हल्ला केला.
यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि.३१) रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. तिसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर अभिषेक मरकड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अभिषेक बाळासाहेब मरकड (वय २०), धंदा शेती, रा. मढी, ता. पाथर्डी), यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिार्यादीत म्हटले आहे की, मी कानिफनाथ देवस्थान मढी येथे सुमारे दोन वर्षांपासून सिक्युरिटी म्हणून काम करतो.
मढी देवस्थानने माझी पशु हत्याविरोधी पथक अंतर्गत मढी देवस्थान परिसरात पायी पेट्रोलींग डयुटी नेमलेली होती, माझ्या सोबत सदर पथकामध्ये मढी गावचे सरपंच संजय बाजीराव मरकड, दत्तात्रय वसंत मरकड, राहुल अशोक कुटे, इतर पोलीस मित्र असे सोबत होते.
आम्ही आज (दि. ३१) रोजी सकाळी पेट्रोलिंग करत असताना सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मढी गावच्या शिवारात दत्तू नामदेव पाखरे यांच्या शेतात काही लोक बोकड घेऊन उभे होते, आम्ही त्यांना येथे पशुहत्या करण्यास बंदी असल्याने बोकड कापू नका, असे सांगितल्याचा राग आल्याने तीन ते चार अनोळखी लोकांनी काठी व लोखंडी चाकू घेऊन आम्हाला शिवीगाळ केली,
या वेळी त्यांच्यापैकी एकाने त्याच्या हातातील चाकू माझ्या डोक्यात डाव्या कानाजवळ मारून मला जखमी केले तर इतरांनी आमच्या पथकातील पोलीस मित्र जगदिश आण्णासाहेब घाडगे यांच्या उजव्या खांद्याजवळ काठीने मारहाण करून जखमी केले तसेच पथकातील राहुल अशोक कुटे, प्रविण अशोक गरगडे,
यांना दोन जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आम्ही सर्व जखमी खासगी वाहनाने तिसगाव येथे आलो व तेथे दवाखान्यात उपचार घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आदिनाथ बडे पुढील तपास करीत आहेत