अहमदनगरमध्ये तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय फोडण्याचा प्रयत्न ! त्या आरोपीला अटक

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : नगर एमआयडीसी परिसरात असलेल्या नवनागापूर येथील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय फोडण्याचा प्रयत्न चौघा जणांनी केल्याची घटना रविवारी (दि.८) रात्री घडली आहे.

परिसरातील नागरिकांनी सतर्कता दाखवत पोलिसांना कळविल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यातील दोघांना पकडले असून, दोन जण पळून गेले. त्यातील आणखी एकाला पोलिसांनी पकडले आहे. हे सर्व चोरटे अल्पवयीन असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

याबाबत कोतवाल संदीप बबनराव गाडेकर (रा. नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौघा चोरट्यांनी रविवारी रात्रीच्या वेळी नवनागापूर येथील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयाचा दरवाजा तोडून आत आत प्रवेश केला.

हा प्रकार परिसरातील काही नागरिकांनी पाहिल्यावर त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांना पकडले, तर दोघे जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

या पकडलेल्या दोघांकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी त्यांच्या अन्य दोन साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली. त्यावरून पोलिसांनी आणखी एकाला पकडले आहे. या चौघा आरोपींच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पकडलेले तिन्ही आरोपी हे अल्पवयीन असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. फरार असलेल्या एकाचा पोलिस शोध घेत असून, पुढील तपास स.पो.नि. राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. गणेश चौधरी करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe