अहिल्यानगरात अतुल शहा यांचं मार्गदर्शन, शुध्द शाकाहार घेतल्यास आजारही आपल्यापासून दूर राहतात!

Published on -

अहिल्यानगर – निसर्गाच्या जवळ राहून जर आपण शुध्द शाकाहारी आहार घेतला, तर कोणताही आजार आपल्या आसपासही फिरकणार नाही, असं मुंबईचे अतुल शहा यांनी आपल्या अनुभवातून सांगितलं. त्यांच्या या व्याख्यानाने उपस्थितांना निरोगी जीवन आणि रोगमुक्तीचा एक नवा दृष्टिकोन दिला आणि सगळेच मंत्रमुग्ध झाले.

राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषिजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्यस्मृतीदिन आणि १२५ व्या जन्मोत्सवानिमित्त जैन सोशल फेडरेशनने प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू केलेल्या भगवान महावीर व्याख्यानमालेतलं पाचवं पुष्प अतुल शहा यांनी ‘आहार आणि आरोग्य’ या विषयावर गुंफलं.

आनंदधाममध्ये झालेल्या या कार्यक्रमात निखिलेंद्र लोढा आणि सुरेश कटारिया यांच्या हस्ते शहा यांचा सत्कार करण्यात आला. आपण आपल्या आरोग्याबाबत नेहमी जागरूक असायला हवं, असं शहा म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आपला आहार आणि विहार हेच निरोगी आयुष्याचं रहस्य आहे. मला एक असा आजार झाला होता ज्यावर मेडिकल सायन्सकडे काहीच उपाय नव्हता. पण मी शुध्द शाकाहारी आहार स्वीकारला आणि त्या आजारावर मात केली.”

देवाने बनवलेलं हे मानवी शरीर खरंच अप्रतिम आहे. ते स्वतःच आतून बरं होतं, त्याला औषधांची गरजच नाही. ९० टक्के आजार तर शरीर स्वतःच बरे करतं. पण हे आजार एकदम होत नाहीत. त्याची लक्षणं ५ ते १० वर्ष आधीच दिसायला लागतात.

आपण त्याकडे दुर्लक्ष केलं, तरच आजार आपल्याला गाठतो. जंगलातले प्राणी-पक्षी आजारी पडतात, तेव्हा त्यांच्यावर कोणता डॉक्टर उपचार करतो? असा प्रश्न त्यांनी विचारला आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

भगवान महावीरांनी सांगितलंय की, एका हातावर बसेल इतकंच खा. पाणी आपल्या शरीराची स्वच्छता करते. म्हणूनच थंडीत रोज दीड लिटर आणि उन्हाळ्यात अडीच लिटर पाणी प्यायलाच हवं.

दररोज किमान २० मिनिटं प्राणायाम करा. आठवड्यातून एक तास तरी सकाळच्या ऊन्हात बसा. आजकाल भोजन म्हणजे जिभेचं लाड आणि मनोरंजन झालंय.

पाणी न पिता उपवास करा. वर्षातून एकदा आठवडाभर उपवास करा, आरोग्य सुधारेल आणि आजारांपासून मुक्ती मिळेल.

आपल्या देशाची प्रगती ही आपण आजारमुक्त राहण्यातूनच होणार आहे. भारतातच ताजं आणि चांगलं भोजन मिळतं. चांगलं खा, मस्त राहा आणि आजारमुक्त आयुष्याचा आनंद घ्या, असं आवाहन त्यांनी स्लाइड शो आणि उदाहरणांसह केलं.

प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केलं, तर सरोज कटारिया यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe