अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील पुस्तकप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे ! ‘सकाळ’ आयोजित पुस्तक महोत्सव शुक्रवारपासून सावेडीतील जॉगिंग ट्रॅकवर सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध प्रकाशनांची पुस्तके, नामवंत लेखकांशी संवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत पाहायला मिळणार आहे.
उद्घाटन आणि पहिला दिवस

शुक्रवारी (ता. २१) सकाळी ११ वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे, आमदार संग्राम जगताप, महापालिका आयुक्त यशवंत डांगे आणि पद्मश्री पोपटराव पवार उपस्थित राहतील. सायंकाळी ४ वाजता डॉ. सदानंद मोरे ‘मराठी भाषा आणि सांस्कृतिक वारसा’ या विषयावर बोलतील. याचवेळी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रा. मोहंमद आझम आणि बंगाली साहित्याचे अनुवादक विलास गिते यांचा गौरव होईल. सायंकाळी इंडियन आयडॉल फेम अंजली व नंदिनी गायकवाड यांचा ‘स्वरयात्रा’ हा संगीतमय कार्यक्रम सादर होईल.
दुसरा दिवस: साहित्य आणि संगीत
शनिवारी (ता. २२) सकाळी १०:३० वाजता ‘गोष्ट इथे संपत नाही’ हा अनोखा कार्यक्रम सारंग भोईरकर आणि सारंग मांडके सादर करतील. त्यानंतर डॉ. संजय कळमकर ‘साहित्यानंद’ या कार्यक्रमात साहित्यातील गमतीजमती उलगडतील. सायंकाळी गीतकार गणेश शिंदे आणि गायिका सन्मिता शिंदे ‘गोष्टीचे पुस्तक आणि पुस्तकातील गोष्ट’ हा खास कार्यक्रम घेऊन येतील, सोबत गीतांचाही आनंद घेता येईल.
तिसरा दिवस: संवाद आणि कविता
रविवारी (ता. २३) मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी प्रसाद मिरासदार यांची मुलाखत घेतील. दुपारी १२:३० वाजता ‘सकाळ’ प्रकाशनाचे लेखक रवींद्र कांबळे, सुमित डेंगळे, प्रकाश जाधव, सुधाकर रोहोकले आणि डॉ. अर्जुन शिरसाठ यांच्याशी अमृता देसर्डा संवाद साधतील. दुपारी ३ वाजता आदित्य निघोट आणि भूषण पटवर्धन यांचे संवादसत्र असेल. सायंकाळी माजी आमदार लहू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल, ज्यात अरुण म्हात्रे, शशिकांत शिंदे, डॉ. संजय बोरुडे आणि अमोल बागूल सहभागी होतील.
समारोप
सोमवारी (ता. २४) सकाळी ११ वाजता सहायक ग्रंथालय संचालक सचिन झोपुले आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी अविनाश येवले ग्रंथालय चळवळीवर मार्गदर्शन करतील. दुपारी १ वाजता लेखक देवा झिंजाड वाचकांशी संवाद साधतील. दुपारी ३ वाजता माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी ‘भविष्यातील आव्हानांसाठी तरुणाईची तयारी आणि पुस्तकांचे महत्त्व’ या विषयावर बोलतील. सायंकाळी समारोपात साहित्यिक विश्वास पाटील ‘संभाजी एक तेजस्वी योद्धा’ या विषयावर व्याख्यान देतील.
महोत्सवात काय खास ?
अहिल्यानगर महापालिकेच्या सहकार्याने होणाऱ्या या महोत्सवात १०० हून अधिक प्रकाशनांचे स्टॉल असतील. सवलतीच्या दरात पुस्तके खरेदीची संधी मिळेल. क्रॉसवर्डसह इंग्रजी साहित्याचे स्टॉलही असतील. बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी पुस्तके उपलब्ध असतील. कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सभागृह आणि खाद्यपदार्थांसाठी खाऊगल्लीही आहे. हा महोत्सव पुस्तकप्रेमींसाठी चार दिवसांची मेजवानी ठरणार आहे!