जागतिक क्षय रोग दिनाच्या निमित्ताने सोमवारी शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन; आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती

Published on -

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्रांनी त्यांच्या परिसरातील गरोदर मातांची माहिती घेऊन त्यांची संस्थेत नोंदणी करून घ्यावी, त्यांचे समुपदेशन करून सर्व तपासण्या वेळेत कराव्यात. माता मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

दरम्यान, सोमवारी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती व प्रबोधनासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात येणार आहे. यात सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आदींनी सहभागी व्हावे, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिल्या आहेत.

माता मृत्यू रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी स्तरावर बैठका घेतल्या. त्यानंतर आयुक्त स्तरावर बैठक पार पडली. यात आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली माता मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, स्त्री रोग संघटनेचे डॉ. अमित करडे, डॉ. वृषाली पाटील, आयएमएचे अध्यक्ष डॉ. सी. डी. शर्मा, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. गणेश मोहाळकर, डॉ. प्रवीण डुंगरवाल आदींसह महानगरपालिकेचे सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

माता मृत्यू रोखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व आरोग्य केंद्रांनी त्यांच्या परिसरातील गरोदर मातांची माहिती संकलित करावी. त्यांची भेट घेऊन संस्थेत त्यांची नोंदणी करून घ्यावी. त्यांचे योग्य समुपदेशन करावे. आवश्यक असलेल्या सर्व तपासण्या करून त्यांना वेळेत योग्य उपचार मिळतील, याची दक्षता घ्यावी, असे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी सांगितले.

शहरातील नागरिकांनीही त्यांच्या घरातील गरोदर महिला असल्यास महापालिकेच्या आरोग्य केंद्रात, बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात संपर्क साधावा. वेळेत तपासण्या करून घ्याव्यात, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

दरम्यान, सोमवारी जागतिक क्षयरोग दिवस आहे. या निमित्ताने जुन्या महानगरपालिकेपासून जनजागृतीसाठी रॅली काढण्यात येणार आहे. जुनी महानगरपालिका, आशा टॉकीज, भिंगारवाला चौक, एम जी रोड, डाळमंडई, पारशा खुंट, धरती चौक ते बूथ हॉस्पिटल पर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे. सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, लॅब टेक्निशियन, आशा सेविकांनी यात सहभागी व्हावेत, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe