अहिल्यानगर, दि. २०- शासनमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना कर्ज वाटपामध्ये प्राधान्य देत बँकांनी संवेदनशीलतेने अधिकाधीक कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी रिझर्व बँकेचे प्रतिनिधी राजेंद्र कनीशेट्टी,
जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक विक्रम पठारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे, उपजिल्हा निबंधक गणेश पुरी, पशुसंवर्धन उपायुक्त सुनील तुंभारे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, शासकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या कर्जांची प्रकरणे बँकांकडे संबंधित विभागामार्फत पाठविण्यात येतात. अशी कर्ज प्रकरणे मंजूर करण्याच्या प्रक्रीयेत विलंब लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. बँकांमध्ये प्रलंबित असलेले अर्ज तातडीने निकाली काढण्यात यावेत. सुटीच्या दिवशी बँकांमध्ये कर्ज प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करत अर्जांची असलेली प्रलंबितता संपविण्यात यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिल्या. लाभार्थ्यांनी कर्जासाठी सादर केलेले अर्ज किरकोळ असलेल्या त्रुटी अभावी नाकारू नयेत. अर्जामध्ये त्रुटी नसतानाही अर्ज नाकाराल्यास त्याची जबाबदारी बँकांवर निश्चित करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यात बचतगटांचे काम अत्यंत चांगले आहे. बचतगटातील महिलांना विविध उद्योगाच्या उभारणीसाठी मागणीनुसार कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत बचगटातील महिलांना कर्ज प्रकरणे कशा पद्धतीने सादर करावीत याबाबतचे प्रशिक्षणाचे आयोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
यावेळी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, प्रधानमंत्री मुद्रा योजना, सीएमईजीपी,पीएमईजीपी, एमएसआरएलएम, पी. एम विश्वकर्मा यासह ईतर विभागामार्फत कर्ज पुरवठ्यासाठी दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी जिल्हा पत आराखडा २०२५ चे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
बैठकीस जिल्ह्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.