आदिवासी भागामध्ये बोगस डॉक्टरांचे बस्तान ! अघोरी उपचार करून जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

Ahmednagar News : अकोलेच्या आदिवासी भागामध्ये बंगाली डॉक्टरांचे आदिवासी बांधवांवर अघोरी उपचार सुरु आहेत. आदिवासी बांधवांच्या जिवाशी खेळणाऱ्या या बोगस डॉक्टरांवर वेळीच पायबंध घातला गेला नाही तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता आदिवासी भागामध्ये निर्माण झाली आहे.

अकोले तालुक्यातील पश्चिमेला आदिवासी बांधवांचे वस्तीस्थान असून याच आदिवासी बांधवांच्या वस्तीस्थानामध्ये बंगाली डॉक्टरांनी आपले बस्तान बसविले आहे. मुळातच कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय ज्ञान या बंगालमधून आलेल्या व्यक्तीकडे नसून आदिवासी बांधवांच्या अज्ञानाचा फायदा घेत बारी (जहागिरदार वाडी) मान्हेरे, बाभुळवंडी, शेणीत व इतर ठिकाणच्या अनेक गावांमध्ये या बोगस मुन्नाभाईंनी आपली वैद्यकीय दुकाने थाटली आहेत.

हे बंगाली मुन्नाभाई अगदी बिनबोभाट आदिवासी बांधवांवर उपचार करताना दिसत आहेत. भंडारदरा परिसरामध्ये फक्त शेंडी याच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून शेंडी येथे इतरही वैद्यकीय परवाना असलेले डॉक्टर उपलब्ध आहेत. लाडगाव येथेही प्राथमिक आरोग्य केंद्र असून येथील कर्मचारी वर्ग ही सुसज्ज आहेत.

परंतु बोगस मुन्नाभाई अनेक खेड्यामध्ये आपली वैद्यकीय दुकाने उभारली आहेत. थंडी तापापासून गर्भपातापर्यंत उपचार या बोगस मुन्नाभाईंकडून केले जात आहेत. मागील वर्षी शेणीत येथील एका महिलेवर गर्भपातामुळे आपला जीव गमविण्याची वेळ आली होती.

या महिलेवरही उपचार परवानाधारक डॉक्टरांकडून झाला नसल्याचे समजते. बोगस मुन्नाभाईकडून हात पाय दुखणे, अगांत कणकण, डोके दुखणे, अशा किरकोळ आजारावर गोळ्या औषध न देता सलाईन लावत चक्क पैशाची उकळणी केली आहे. सदर बोगस मुन्नाभाई हे आदिवासी बांधवांच्या आजारावर चुकीचे औषधोपचार करत त्यांच्या जिवाशी खेळत आहे.

तसेच पैशाचीही भरमसाठ लुट करत आहे. या बोगस मुन्नाभाईंना औषधोपचार कोठून होतो, याची चौकशी करुन त्या औषध विक्रेत्यावर कारवाई करत त्यांचे परवानेही कायमस्वरुपी बंद करण्यात आले पाहिजे. तसेच बोगस मुन्नाभाईंना कुणाचे अभय आहे.

ज्या परिसरात यांनी आपली वैद्यकीय दुकाने थाटली आहेत. त्यांच्यावर त्या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी कारवाई का करत नाहीत ? अकोले तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना या मुन्नाभाई डॉक्टरांचे संपुर्ण जाळे माहीत आहे ? तरीही त्यांचे पथक का कारवाई करत नाही? याचीही चौकशी होण्याची गरज आहे. अकोले तालुक्यातील विद्यमान आमदार डॉक्टर असून त्यांनीच पुढाकार घेऊन सदर बोगस मुन्नाभाईंचा कायम स्वरुपी बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.