काळजी घ्या रे..! हवामान विभागाने दिला आहे ‘हा’ इशारा..?

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  भारताचा बहुतांश भाग हा थंडीच्या कडाक्याने गारठला आहे. राज्यात देखील कडाक्याची थंडी पडली असून, नगर औरंगाबाद, पुण्यासह आणखी काही शहरांचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे.

अशातच हवामान विभागाने पुढील काही दिवस थंडीचा जोर असाच कायम राहील असा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा कडाक्याची थंडी पडणार आहे.

गुरुवारी सकाळी राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर येथे ८.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर नगरमध्ये ९ अंश सेल्सिअसची नोंद झाली.

हे सरासरी तापमानाच्या ४ अंशांनी कमी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

मुंबईसह औरंगाबाद, नाशिक, नागपूर, परभणीसह अनेक जिल्ह्यांचा पारा घसरला असून, हूडहुडी भरली आहे.

त्यातच दोन दिवसात पुन्हा थंडीची लाट येणार असल्याने आणखीनच कडाक्याची थंडी पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.