संगमनेर- आश्वी खुर्द येथे नव्याने सुरू झालेल्या परमिट रूम आणि बिअर बारला ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे विरोध दर्शवला असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाना दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीने याबाबत माहिती मागवण्यासाठी विभागाला पत्र पाठवले, परंतु अद्याप कोणताही खुलासा किंवा कागदपत्रे प्राप्त झाली नसल्याचे सरपंच आणि ग्रामस्थांनी सांगितले.
या प्रकरणाने गावात तणाव निर्माण झाला असून, ग्रामसभेच्या ठरावाचा अवमान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनी परवान्याची चौकशी आणि कारवाईची मागणी लावून धरली आहे.

परमिट रूम आणि बिअर बारचा वाद
आश्वी खुर्द येथील प्रवरा उजव्या कालव्यालगत शिवाजी बाळकृष्ण भोसले यांच्या जागेवर प्रवीण राधुजी गायकवाड यांच्या नावाने परमिट रूम आणि बिअर बार सुरू झाला आहे. 11 मे 2023 रोजी प्रवीण गायकवाड यांनी ग्रामपंचायतीकडे परमिट रूम आणि हॉटेलसाठी परवाना मागणारा अर्ज सादर केला होता.
मात्र, ग्रामसभेने हा अर्ज फेटाळत परवाना न देण्याचा ठराव गट विकास अधिकाऱ्यांच्या परवानगीने मंजूर केला. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, या व्यवसायामुळे गावातील शांतता आणि सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. तरीही राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्रामपंचायतीचा ठराव डावलून परवाना दिल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे.
कागदपत्रांचा गैरवापर आणि ग्रामस्थांचा आक्षेप
शिवाजी भोसले यांना वैयक्तिक काम आणि शॉपिंग सेंटरमधील हॉटेल मनिषसाठी ग्रामपंचायतीने कागदपत्रे दिली होती. मात्र, या कागदपत्रांमध्ये परमिट रूम किंवा बिअर बारसाठी परवाना मंजुरीचा कोणताही उल्लेख नव्हता. ग्रामस्थांचा आरोप आहे की, या कागदपत्रांचा गैरवापर करून परमिट रूम आणि बिअर बार सुरू करण्यात आला.
यामुळे गावात अस्वस्थता पसरली असून, कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी या व्यवसायामुळे गावातील तरुण पिढीवर वाईट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीने त्वरित कारवाईची मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीचा आरोप
ग्रामस्थांच्या तक्रारींनंतर सरपंच अलका बापूसाहेब गायकवाड यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र पाठवून परवाना मंजुरीच्या कागदपत्रांची माहिती मागवली. कोणत्या आधारावर हा परवाना देण्यात आला आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे जोडली गेली, याचा खुलासा मागण्यात आला. मात्र, विभागाने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे ग्रामस्थांनी उत्पादन शुल्क विभाग संबंधितांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला आहे.
सरपंच अलकाताई यांनी स्पष्ट केले की, ग्रामसभेचा ठराव हा गावाच्या हितासाठी घेतला गेला होता, परंतु विभागाच्या उदासीनतेमुळे ग्रामसभेचा अवमान झाला आहे. ग्रामपंचायतीच्या ठरावाला किंमत नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.