‘लाडकी बहीण’ नको गं बाई…. ! कागदपत्रांसाठी ‘लाडक्या बहिणीं’ची पळापळ अन आर्थिक लूटमार ..?

Pragati
Published:

Ahmednagar News : शासनाने नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना जाहीर केली आहे. ही योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची सध्या ‘धांदल’ उडाली आहे. कागदपत्रांसाठी महिला आणि त्यांच्या कुटुंबियांची ‘पळापळ सुरू आहे.

याचा गैरफायदा उठवत अनेक सेतू, तलाठी कार्यालये, एजंट आणि शेवटी प्रवासी वाहनधारकांकडून देखील या महिला, नागरिकांची चांगलीच आर्थिक लूट केली जात असल्याचे गंभीर प्रकार घड़त आहेत.

त्यामुळे सध्या होत असलेली गर्दी अन आर्थिक लूटमार पाहून अनेक महिला या योजनेकडे पाठ फिरवतील अशी शंका उपस्थित केली जात आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची १ जुलैपासून राज्यात अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसात उत्पन्नाचा आणि रहिवासी दाखला मिळविण्यासाठी लाभार्थ्यांनी तलाठी, सेतू कार्यालयात प्रचंड गर्दी केली.

सदरचे दाखले मिळण्यासाठी मोठा अवधी लागणार असल्याने याबाबत वाढलेला दबाव पाहून शासनाने योजनेच्या निकषात काही बदल केले.

मात्र सदरचे बदल स्थानिक पातळीवर अद्यापही माहिती झालेले नसल्याने बुधवारी देखील भिंगार, केडगावसह अनेक तलाठी कार्यालय व सेलू कार्यालयात महिला, नागरिकांनी नेहमीप्रमाणे कागदपत्रांसाली गर्दी करत आहेत.

यातील अनेकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत या महिला आणि नागरिकांची प्रचंड आर्थिक लूट केली जात आहे. रहिवाशी दाखला , उत्पन्नाचा दाखला, अर्ज भरण्यासाठी असे अवाजवी शुल्क आकारण्यात येत असून, नागरिकांची मोठी आर्थिक लूट केली जात आहे.

त्याचबरोबर या कार्यालयापर्यंत येण्यासाठी प्रवासी वाहनधारकांकडून लाभार्थी प्रवाशांकडून अवाच्या सव्वा भाडे वसूल केले जात आहे. योजनेचा लाभ मिळेल तेव्हा मिळेल, पण आज मात्र नागरिकांना आर्थिक लुटमारीला सामोरे जावे लागत आहे.

मनमानी पद्धतीने शुल्क आकारणी करून लाभार्थ्यांकडून पैसे उकळले जात आहेत. योजनेच्या अंमलबजावणीबाबत यंत्रणेतच समन्वयाचा अभाव असल्याने लाभार्थी महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe