अहिल्यानगर- गर्मी वाढताच कोल्ड्रिंक, रसवंती, उसाचा रस, लिंबू सरबत, आइसगोळे यांना मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतेचे निकष न पाळता बनवलेला बर्फ वापरला जात आहे. बर्फाच्या उत्पादनात वापरण्यात येणारे पाणी दूषित असल्यामुळे त्या बर्फातून पचनतंत्रावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
बर्फ आरोग्यासाठी घातक
आइसक्यूबसारखा स्वच्छ बर्फ महागडा असल्याने बर्फ विक्रेते मोठ्या प्रमाणावर कूलिंग बर्फ वापरत आहेत. कूलिंग बर्फ हा सामान्यतः खाण्यासाठी नव्हे तर थंड ठेवण्यासाठी वापरला जातो. अशा बर्फात अमोनिया आणि अन्य केमिकल्सचा वापर केल्यामुळे तो आरोग्यासाठी घातक ठरतो. नागरिक कोणता बर्फ वापरला जातोय याची तपासणी करत नाहीत, हीच गंभीर बाब आहे.

बर्फ बनवायचे रसायन धोकादायक
बर्फाचा आकार मोठा राहावा आणि टिकाऊपणा वाढावा म्हणून बर्फ बनवताना अमोनिया वायूसह अन्य घातक वायू वापरले जातात. हे रसायन थेट पाचनसंस्थेवर परिणाम करते. विशेषतः आइसगोळे, उसाचा रस, ताक, लस्सी यांसारख्या थंडपेयांत अशा बर्फाचा वापर होतो आणि त्यामुळे अपचन, जंतुसंसर्ग, आणि अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढतो.
प्रशासनाकडून कारवाई
सोपान इंगळे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी माहिती दिली की शहरासह ग्रामीण भागातील बर्फाचे नमुने घेतले जाणार आहेत. याची तपासणी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनीही बर्फाची स्वच्छता तपासूनच ते खाद्यपदार्थांत वापरावे, तसेच अशुद्ध बर्फाचा वापर करणाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदवावी.
खबरदारी बाळगावी
खराब बर्फ टाळण्यासाठी नागरिकांनी स्वच्छ पाणी वापरलेले थंडपेयच घ्यावे. ISI मार्कशिवाय पाण्याच्या बाटल्या आणि पाऊच वॉटर टाळावे. आइसगोळा, सरबत यांसारख्या पदार्थांमध्ये वापरण्यात आलेला बर्फ स्वच्छ आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे. गोठवलेले पाणी दिसायला स्वच्छ असले तरी त्यामध्ये विषाणू सक्रिय असतात हे विसरता कामा नये.