१५ जानेवारी २०२५ पाथर्डी : भगवान गडाचे संस्थापक वैकुंठवासी संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त राज्याच्या विविध भागातून लाखों भाविकांनी आज दिवसभर दर्शनाचा लाभ घेतला. ७५ क्विन्टल बूंदी व १५ ट्रॅक्टर ट्रॉली भरून चिवडाचा महाप्रसाद भाविकांना वितरित करण्यात आला.नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते भगवान बाबांच्या समाधीची महापूजा व अन्य धार्मिक विधी पार पडले.
गडाच्या वतीने प्रधानाचार्य नारायण स्वामी यांचे हस्ते न्यायमूर्तीचा सत्कार करण्यात आला.दुपारी महंत नामदेव शाखी यांचे कीर्तन झाले.या या सोहळ्यासाठी लाखो भाविक उपस्थित होते.मुख्य सभा मंडपाबाहेर स्क्रीन लावून सोहळा ऐकण्याची सुविधा यंदा प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली.संभाजीनगरचे भाविक बाळासाहेब सानप दर्शनासाठी हेलिकॉप्टर घेऊन आले होते, प्रचंड गर्दी असूनही भाविकांची शिस्त लक्षवेधी ठरली.
बऱ्याच वर्षानंतर संक्रांत व पुण्यतिथी उत्सव एकाच दिवशी आल्याने पर्वणीसाठी सुद्धा भाविक वाढले.१९ जानेवारी १९६५ रोजी पौश वद्य प्रतिपदेला भगवान बाबांचे महानिर्वाण झाले.३० कोटी रुपये अंदाजपत्रकीय किमतीचे अत्यंत भव्य असे दगडी शिळे मध्ये बांधलेले मंदिर आकाराला येत आहे.विशाल दगडी शिळा कर्नाटकातून आणल्या आहेत.
महंत नामदेव शास्त्री यांनी यासाठी अथक परिश्रम घेत मंदिराच्या कामाला वाहून घेतले आहे.राज्यसभा अन्य भागातून अगदी परदेशातूनही मदतीचा ओघ वाढत आहे.आज तीन कोटी रुपयांच्या देणग्या भाविकांनी जाहीर केल्या. बीडचे उद्योजक शिवा भाऊ बिहानी यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला.मुख्य सोहळ्यासाठी भगवान गडाला गुरुस्थानी मानणारे २५ गडांचे महंत, त्याचप्रमाणे येळेश्वर संस्थांचे रामगिरी महाराज, राधाताई सानप महाराज, अॅड. प्रताप ढाकणे आदीसह अनेक मान्यवर संत, महंत उपस्थित होते.
यावेळी नामदेव शाखी सानप माणाले, संत भगवान बाबानी अंधश्रद्धा बाजुला ठेवत भाविकांसाठी शिक्षणाचे महत्त्व पटवले,वारकरी संप्रदायाची शिकवण देत हजारो कीर्तनकार प्रवचनकारांना त्यांनी पाठबळ दिले, जीवनात कितीही संकटे आली तरी संतांची साथ सोडू नका.
संत हेच ईश्वराकडे नेणारी खरे मार्गदर्शक असून धर्म विचारांची कास धरत जीवन कृतार्थ करता येते.भगवान बाबांच्या नावाचा महिमा एवढा प्रचंड असून केवळ नामस्मरणाने सकारात्मक ऊर्जेची अनुभूती येते.गडावरील संत ज्ञानेश्वरांचे मंदिर समस्त वारकरी संप्रदायासह धर्म व संत जीवनावर प्रेम करणाऱ्या भाविकाला प्रेरणा देणारे ठरेल.राज्याच्या आध्यात्मिक, निसर्ग व धार्मिक पर्यटनासाठी सुद्धा येत्या काव्ळात भगवानगड ओळखला जाईल.
ऊसतोड कामगार व शेतकरी वर्गाने दिलेल्या देणगीतून राज्यात एकमेव असे भव्य संत ज्ञानेश्वरांचे मंदिर पूर्ण होईल.पुढील वर्षी दसऱ्याला होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यासाठी आपण राज्यभर दौरा करून भाविकांना निमंत्रण देणार आहोत.राज्याचे आध्यात्मिक शक्तीपीठ म्हणून भगवानगडाची ओळख सर्वच भाविकांना समाधान देणारी ठरेल असा विश्वास भगवान गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शाखी सानप यांनी व्यक्त केला.