Bhandardara Dam : महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे जलस्रोत असलेल्या भंडारदरा धरणातून पाण्याची गळती होत असून, लाखो रुपये खर्चुनही ही समस्या अद्याप सुटलेली नाही. शासनाच्या विविध प्रयत्नांनंतरही रोज पाणी वाया जात आहे, ज्यामुळे पाणी टंचाईच्या झळा बसणाऱ्या परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
ब्रिटिश कालखंडात उभारलेल्या या धरणाने उत्तर नगर जिल्ह्याला समृद्ध केले असून, शेती ओलिताखाली आली आहे. धरणात चार मोऱ्या बसविण्यात आल्या असून, त्यापैकी दोन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने चालवल्या जातात, तर उर्वरित दोन अजूनही ब्रिटिशकालीन यंत्रणेतूनच हाताने चालवाव्या लागतात. ९९ वर्षे जुन्या या संरचनेतून अनेक वर्षांपासून पाण्याची गळती सुरू असून, उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना धरणातील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाणी वाया जाण्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून शासनाने विविध प्रयोग करून ही गळती थांबविण्याचा प्रयत्न केला असला तरी, अद्यापही यश मिळालेले नाही. या धरणाच्या सुरक्षिततेबाबतही मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. पूर्वी येथे आठ पोलीस सुरक्षेसाठी नियुक्त केले जात होते, परंतु सध्या सुरक्षा यंत्रणा कमकुवत झाली आहे.
धरणाच्या परिसरात फक्त दोनच सीसीटीव्ही कॅमेरे असून, केवळ एक-दोन कर्मचाऱ्यांवर संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण व्यवस्थापन जवळपास एकाच कर्मचाऱ्यावर अवलंबून असून, वरिष्ठ अधिकारी धरण मुख्यालयात क्वचितच येतात.
भंडारदरा धरणाच्या देखभालीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो, मात्र त्याचा उपयोग योग्यरीत्या होत आहे की नाही, यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. धरणावर नवीन कामे झाल्याचे दिसत नाहीत, आणि बसविलेले सीसीटीव्हीही काही महिन्यांपूर्वीच सुरू करण्यात आले आहेत.
विश्रामगृहाचा रस्ता वर्षानुवर्षे खराब अवस्थेत असून, कधीही डांबरीकरण करण्यात आलेले नाही. या सर्व समस्यांमध्ये सर्वात गंभीर म्हणजे पाण्याची गळती. रोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असताना प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, हा मोठा प्रश्न आहे. जलसंधारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या धरणाच्या सुरक्षेसाठी आणि दुरुस्तीसाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.