४ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : भंडारदरा लाभ क्षेत्राकरिता सिंचन आणि बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन शनिवार दि. ८ फेब्रुवारी पासून सोडण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत.
जलसंपदा विभागाच्या आधिकाऱ्यांशी चर्चा करुन,लाभ क्षेत्रातील वाढती पाण्याची मागणी आणि उन्हाची तीव्रता लक्षात घेवून, शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्यासाठीही आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, या आवर्तनाचा लाभ रब्बी पिकांसह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठीही होणार आहे.उन्हाची तीव्रता वाढल्याने काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्याही निर्माण झाली आहे.
या आवर्तनाचा लाभ त्या गावांनाही मिळावा,या उद्देशाने सिंचन आणि बिगर सिंचनासाठी एकत्रित आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देण्यात आल्या आहेत.
पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच, शेतकऱ्यांनीही पाण्याचा योग्य विनियोग करावा, असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.