अहमदनगर जिल्ह्यातील अति महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणावर तिरंग्याची प्रतिकृती उभारण्यात आली होती. हा तिरंगा बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. यावेळी जलसंपदा विभागामार्फत भंडारदरा धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.
दि. १५ ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असतो. हा उत्सव साजरा करण्यासाठी भंडारदरा धरणाची शाखा मागे राहिलेली नाही. भंडारदरा धरण शाखेने भंडारदरा धरणाच्या भिंतीवर रंगीत लाईट सोडून तिरंग्याची साक्षात प्रतिकृती सादर केली आहे.

अंधारामध्ये भंडारदरा धरणारे तिरंगा परिधान केला असल्याचे जाणवत असुन तिरंग्याची ही प्रतिकृती पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. मागील वर्षीही भंडारदरा धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडले जात असताना पाण्यामधून तिरंग्याची प्रतिकृती धरण शाखेने तयार केली होती.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पानालोटात मुतखेल गावामध्येसुद्धा त्या गावच्या सरपंच दिपाली सागर रोगटे यांनी संपूर्ण गावामध्ये तिरंगामय वातावरण तयार केले आहे. रात्री संपूर्ण मुतखेल गाव विजेच्या प्रकाश झोतामध्ये तिरंगामय दिसत आहे.