भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, संविधानाच्या माध्यमातून देशाला दिशा दिली

Updated on -

अहिल्यानगर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विचारांचा महासागर आहे. त्यांच्या प्रत्येक वचनामध्ये समतेची ज्योत आहे, अन्यायाविरोधात लढण्याचे बळ आहे. त्यांनी उच्च शिक्षण, संविधान, आणि समाज परिवर्तन या माध्यमातून देशाला दिशा दिली.

डॉ. बाबासाहेबांनी उच्चारलेले शब्द ही त्यांनी स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची दाखवलेली वाट होती. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सर्वांनी काम करावे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड येथील पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया, आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार उपस्थित होते. जिल्हाधिकारी पंकज आशिया व आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच, उपस्थितांना संविधानाच्या प्रती यावेळी भेट म्हणून देण्यात आल्या.

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा’ या मंत्रात आजही अमर ऊर्जा आहे. त्यांचे विचार प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक ठरतात. त्यांच्या विचारांची प्रेरणा, त्यांचे कार्य नव्या पिढीला माहिती व्हावेत, त्यांचे कार्य कायम स्मरणात राहावे, यासाठी मार्केटयार्ड चौकात महानगरपालिकेकडून पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे.

या प्रस्तावित पूर्णाकृती पुतळ्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच, आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक महानगरपालिकेकडून शहरात उभारण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe