लवकरच भिंगारकरांची इच्छापूर्ती ! भिंगार छावणी मंडळाचा प्रश्न चार महिन्यात निकाली लागणार !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहराजवळ असलेल्या भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश आता अहमदनगर महानगरपालिकेत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता लवकरच भिंगारचा महानगरपालिकेत समाविष्ट होणार, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली.

दरम्यान भिंगार शहराचा महानगरपालिकेत समावेश करावा. अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. मात्र आता या निर्णयामुळे लवकरच भिंगारकरांची महानगरपालिकेत समाविष्ट होण्याची इच्छापूर्ती होणार आहे.

भिंगार छावणी परिषद रद्द करून अहमदनगर महापालिकेत समावेश करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे रविवारी (दि.३) खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या समवेत भिंगारवासियांची बैठक संपन्न झाली.

यावेळी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, भिंगार छावणी परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, निखिल वारे, प्रा. माणिकराव विधाते, अनिल शिंदे, भैय्या गंधे, सतिश शिंदे संजय सपकाळ,

संजय ढोणे, महेश नामदे, वसंत राठोड, शुभांगी साठे, किशोर कटोरे अक्षय भांड, सुनील लालबोंद्रे, संजय छजलानी मातीन शेख, मुसा सय्यद श्याम वाघस्कर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

या बैठकीत सर्वप्रथम विखेंनी भिंगार छावणी मंडळाचा महानगरपालिकेच्या हद्दीत प्रवेश करण्यात यावा की नाही, याबाबत मते जाणून घेतली. यावेळी या छावणीतून आमची सुटका करा, आमच्या समस्या सोडवा, भिंगार शहराला महापालिकेत समाविष्ट करा अशी एकमुखी मागणी उपस्थित नागरिकांनी केली.

छावणीतून कशा प्रकारे त्रास दिला जातो? त्यांच्याकडे दुर्लक्ष कसे केले जाते? याचा पाढाच नागरिकांनी खासदार विखेंसमोर वाचला. यावर बोलताना विखे म्हणाले की, भिंगार छावणी मंडळाचा प्रश्न येत्या चार महिन्यात निकाली लागेल. त्यामुळे तुमची लवकरच सुटका होईल, अशी ग्वाही खासदार विखेंनी यावेळी भिंगारकरांना दिली.

येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला जाईल आणि त्यानंतर भिगार छावणी मंडळ बरखास्त होऊन त्याचा समावेश अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत होईल, असे देखील खासदार विखे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe