Ahmednagar News : पंजाबमधील अमृतसरमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याच्या वाहनाखाली स्फोटके ठेवून पसार झालेल्या तिघा दहशतवाद्यांपैकी एकाला शिर्डीत अटक करण्यात आली.
नगर जिल्हा पोलिस आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोध पथकाने ही कारवाई केली. पकडलेला आरोपी रजेंदरकुमार उर्फ बाऊ रामकुमार वेदी (रा. पट्टण तहसील, जि. तरणतारण, पंजाब) याला पंजाब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी सांगितले की, दहशतवादी रजेंदरकुमार याच्यासह त्याचे साथीदार हरपालसिंग व फत्यादीपसिंग हे तिघे पंजाबचे पोलीस उपनिरीक्षक दिलबागसिंग यांच्या वाहनाखाली स्फोटके ठेवून पसार झाले होते.
त्यांनी दिल्लीमार्गे विमानाने मालदीवला पसार होण्याची योजना आखली होती. मात्र दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांची करोना चाचणी झालेली नसल्याने विमान प्रवास करता आला नाही.
त्यामुळे रजेंदरकुमार दिल्लीहून रेल्वेने नांदेडला निघाला. मात्र, काही कारणामुळे ती गाडी मनमाडपर्यंतच धावली. त्यामुळे तो तेथेच उतरला आणि एका लॉजवर राहिला. तेथून दुसऱ्या दिवशी शिर्डीत आला.
शिर्डीत एका लॉजमध्ये तो थांबला होता. पोलिसांनी याची माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबवून आरोपीला अटक करण्यात आली.
नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाचे निरीक्षक सचिन खैरनार, सहाय्यक निरीक्षक प्रताप गिरी, शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, उपनिरीक्षक रोहिदास माळी, पोलीस अंमलदार नितीन शेलार, नितीन सानप,
अजय पंधारे व दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचारी संजय हराळे व रविंद्र महाले यांनी कामगिरी केली.दहशतवाद्याला न्यायालयात हजर करून प्रवासी कोठडी घेण्यात आली. पंजाबचे पोलिस त्याला घेऊन पंजाबकडे रवाना झाले.