लोणी, दि. ३० पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या चौकशी अहवालानंतर सदर प्रकरणात कोणताही फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल होत नसल्याचा निष्कर्ष २०१९ मध्येच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे दिल्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता नाही. आमची कोणतीही अडचण नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने हे प्रकरण संपले आहे. नव्याने पुन्हा काही चौकशी होणार असली तर, त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याची स्पष्ट भूमीका जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
कारखान्याच्या संदर्भात प्रसारित झालेल्या वृत्ताबाबत बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, याबाबतची नेमकी वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. २००४ साली झालेले प्रकरण आमच्या विरोधकांनी २०१४ मध्ये उकरुन काढले. याबाबत स्थानिक न्यायालया पासून ते उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये याबाबतच्या सुनावण्या झालेल्या आहेत. उच्च न्यायालयाने नेमलेल्या चौकशी आधिका-यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर झाल्यानंतर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात कोणताही फौजदारी स्वरुपाचा गुन्हा होत नसल्याचे स्पष्ट करुन, याचिका निकाली काढलेली आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने हे प्रकरण केव्हाच संपलेले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने राहाता न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी यांचा कलम १५६(३) प्रमाणे केलेला आदेश कायम ठेवल्याने सदरचा गुन्हा दाखल झाला आहे. कोणतीही चौकशी ही गुन्हा दाखल झाल्याशिवाय होवू शकत नाही. त्यामुळे या गुन्ह्याच्या आधारे पुन्हा याच प्रकरणात नव्यानेहोणा-या चौकशीला सामोरे जाण्याची कारखाना व्यवस्थापनाची तयारी आहे. मार्च २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकारणात दिलेल्या आदेशात कारखाना व्यवस्थापन व इतरांच्या विरोधात त्रास होईल अशी कोणतीही जबरदस्तीची कारवाई करु नये असा स्पष्ट आदेश दिलेला असल्याने या प्रकरणातील सर्वच स्पष्टता आता समोर आलेली असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
शिर्डी विधानसभा मतदार संघातील जनतेने सलग आठ वेळा चांगल्या मताधिक्याने मला निवडून दिले आहे. जनतेचा विश्वास कामातून मी सार्थ ठरविला असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले. विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यात महायुतीला मिळालेले यशही मोठे आहे. अनेकांना ते देखवत नाही. त्यामुळेच व्यक्तिव्देशापोटी मला बदनाम करण्यासाठी विरोधक केवीलवाना प्रयत्न करतात असे प्रयत्न यापुर्वीही अनेक वेळा झाले परंतू जनतेने त्यांना थारा दिलेला नाही. आत्ता सुध्दा कारखान्याच्या माध्यमातून बदनामी करण्याचाच प्रयत्न आहे पण यात त्यांना यश मिळणार नाही.
निवडणूक आली की, वातावरण निर्माण करायचे आणि वैफल्यापोटी आरोप करायचे, ही आमच्या विरोधकांची सवय आहे. यामध्ये ते स्वतःची पत घालून बसले आहेत. यासर्व प्रकरणात त्यांचा बोलविता धनी कोन आहे हे सांगण्याची आता आवश्यकता नाही. कारखान्याच्या बाबतीत एवढीच कळकळ त्यांना होती तर, निवडणूकीत सभासदांना सामोरे का गेले नाहीत. सद्यस्थितीत त्यांनी उकरुन काढलेल्या प्रकरणातील योजनेचे ते लाभार्थीही नाहीत जनतेचा विश्वास त्यांनी केव्हाच गमविला आहे. अशी टिका मंत्री विखे पाटील यांनी केली.