अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 AhmednagarLive24 :- एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू ठेवून २ मे पासून शाळांना उन्हाळ्याची सुट्टी देण्याच्या निर्णयला राज्यभरातून विरोध झाला. अहमदनगरमधील शिक्षक संघटनांनीही याला विरोध केला होता.
त्यामुळे शिक्षण विभागाने आता यात थोडा बदल करून स्पष्टीकरण दिले आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाला असल्यास आणि शाळांनी परीक्षांचे नियोजन केले असल्यास त्या ठरल्याप्रमाणे घेण्यात याव्यात.
त्यासाठी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत थांबण्याची गरज नाही. शिवाय परीक्षा संपल्यावर लगेच उन्हाळ्याची सुट्टी देण्यात यावी, असे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहे.
त्यामुळे आता शाळांसमोरील संभ्रम दूर झाला असून, परीक्षा संपताच विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुटीचा मार्ग मोकळा होणार आहे. शिक्षण विभागाने सुरवातील परिपत्रक काढून उन्हाळ्यातही शाळा सुरू ठेवण्यास सांगितले होते.
एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात परीक्षा आणि मेपासून सुट्टी, असे नियोजन त्यात होते. गरज पडल्यास शनिवारी, रविवारीही शाळा सुरू ठेवाव्यात, असेही म्हटले होते. त्यावरून संभ्रम आणि गदारोळ सुरू झाला होता.
ज्यांनी आधीच परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या, त्यांनी पुढे ढकलाव्यात का? पालकांनी सुट्टीतील नियोजन बदलावे का, असे प्रश्न विचारले जाऊ लागले होते.
त्यावर आता शिक्षण विभागाने हे स्पष्टीकरण दिले आहे. संबंधित परिपत्रक केवळ ज्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही, त्यांच्यासाठीच असल्याचे म्हटले आहे.