अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- राज्यात आलेल्या चक्री वादळामुळे कोपरगावात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. असंख्य ठिकाणी सखल भागात गुडघाभर पाणी साठले आहे. घरांची पडझड होऊन संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.
तेव्हा शासनाने तात्काळ झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत व त्याची भरपाई तात्काळ द्यावी, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच या निवेदनाची एक प्रत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, व तहसीलदार विजय बोरुडे यांना दिलीय.
कोल्हे यांनी या निवेदनात म्हंटले कि, गेल्या दोन दिवसात तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांचा ऊस शेतातच आडवा झाला आहे.
या अस्मानी संकटामुळे खरिपाबरोबरच, रब्बी पीक नियोजनावर निसर्गाने पाणी फेरले आहे. तसेच अनेक ठिकाणी ओढ्या नाल्यांना पूर आले आहेत. तर काही ठिकाणी घरांच्या पडझडी होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तरी शासनाने तातडीने या शेतकर्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करून त्याची भरपाई तात्काळ शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करावी अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम