भाजप आमदार राम शिंदे आता बिआरएसच्या नेत्यांसोबत ! टार्गेट मात्र विखेच(?), शिंदेंचं नेमकं प्लॅनिंग काय? पहा..

Published on -

Ahmednagar News : अहमदनगरमधील राजकारण सध्या वेगवेगळ्या वळणावर जात आहे. यात भाजप आमदार राम शिंदे हे जिल्ह्यात कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत तर कधी बिआरएसच्या नेत्यांसोबत दिसत आहेत. त्यामुळे त्यांचे राजकीय गणिते काय आहेत

याबाबत चर्चेचा विषय झाला आहे. परंतु प्लॅटफॉर्म कोणताही असो ते विखे यांनाच टार्गेट करताना दिसत आहेत. आ. राम शिंदे बेलापुरात आले होते. यावेळी त्यांनी बोलताना विखेंवर घणाघात केला. समन्यायी पाणी वाटपाचेही वाभाडे काढले.

यावेळी तेथे बीआरएस नेते माजी आमदार भानुदास मुरकुटे होते. यावेळी त्यांनी एकमेकांच्या मैत्रीविषयी आवर्जून सांगितले.

निवडणुकीत आपला पराभव झाल्यानंतर अनेकांनी आपली मजा पाहिली. परंतु आपण परत आमदार झालो, ते पाच वर्षासाठी नाही, तर सहा वर्षासाठी. आमच्या नादाला कोणी लागले, तर आम्ही त्यांचा नाद मोडल्याशिवाय राहत नाही.

प्रामाणिक काम केले की भले होते म्हणून आपल्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सलग पाच वर्षे पालकमंत्रीपद व पराभव होऊनही पुन्हा सहा वर्षांसाठी आमदारकी मिळाली. काहींना तर आत्ता पालकमंत्री पद मिळालेय असा घणाघात केला.

हा घणाघात कोणावर होता हे सांगणे न लगे ! बेलापूरात यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर कदम, आमदार लहू कानडे, काका कोयटे, सुरेश वाबळे, प्रकाश चित्ते आदी उपस्थित होते.

* समन्यायी पाणी वाटप बाबत वक्तव्य

समन्यायी पाणी वाटप कायदा आणि आताही दुष्काळी परिस्थिती असतांना पाणी सोडले गेले याबाबत माजी आमदार मुरकुटे यांनी राम शिंदे यांचे लक्ष वेधले. यावर त्यांनी असे म्हटले की, पाण्यावरून वरचे आणि खालचे असा संघर्ष सुरू आहे.

आपण पालकमंत्री असताना आपल्या काळात हा कायदा झाला नाही. त्यामुळे कोणाच्या कालखंडात काय उद्योग झाले हे जनतेला माहीत आहे , जनताच न्याय करेल असेही ते म्हणाले.

* मी प्रसंगी राष्ट्रवादीचाही प्रचार केलाय…

माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि आपले मैत्रीचे संबंध आहेत. आता ते भारत राष्ट्र समितीमध्ये गेले आणि त्यांनी पक्ष जिल्ह्यात आणला. त्यांच्या प्रेमाखातर एकदा श्रीरामपूरमध्ये येऊन आपण राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचारही केला होता असे

आमदार राम शिंदे म्हणाले. परंतु याचा नेमका काय अर्थ काढायचा व ते यावेळी नेमकं काय डोक्यात ठेऊन काम करणार याबाबत मात्र त्यानंतर चर्चाना उधाण आले.

* जिल्हा विभाजन तर पक्के पण जिल्हा केंद्र श्रीरामपूर नाही?

जिल्हा विभाजनाबाबत ते म्हणाले की, आपण पालकमंत्री असताना जिल्हा विभाजनचे समर्थन केले होते आणि आताही त्याच बाजूने आहोत. जिल्हा विभाजनाची सर्व प्रक्रिया झाली असून फक्त घोषणा बाकी आहे, असे ते म्हणाले.

परंतु जेव्हा उपस्थितांनी श्रीरामपूर जिल्हा व्हावा याबाबत म्हटले असता आ. प्रा. शिंदे यांनी आपण पालकमंत्री होतो, त्यावेळी मागितले नाही, आता आपण मंत्री पदावर नाही, असे सांगितले. त्यामुळे आता जिल्हा विभाजन तर पक्के पण जिल्हा केंद्र श्रीरामपूर होणार की आणखी काही अशी चर्चा नागरिकांत रंगली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe