Ahmednagar News : भोरवाडी (ता. नगर) येथील गौण खाणकाम व स्टोन क्रशरचा परवाना रद्द करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी नगर-पुणे महामार्गावर कामरगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनानंतर मंडलाधिकारी रूपाली टेमक यांना निवेदन देऊन तातडीने याबाबत कार्यवाही करावी, अन्यथा स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना मुलाबाळांसह येऊन काळे झेंडे दाखविण्याचा इशारा भोरवाडी ग्रामस्थांनी यावेळी दिला.
आंदोलनात पंचायत समिती सभापती रामदास भोर, सरपंच भास्कर भोर, उपसरपंच सुरेश जासूद, बबन भोर, नवनाथ वायाळ, भरत खैरे, देवराम माने, मारुती आंधळे, संतोष आंधळे, प्रदीप पठारे, प्रशांत साठे, कुंडलिक वाघ, अक्षय पानसरे, राहुल जाधव, प्रवीण जासूद, पद्मावती भोर, नर्मदा माने, वंदना माने, चंदा वाघ आदींसह शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

३१ जुलैपर्यंत काम थांबवून परवाना रद्द न केल्यास ३ ऑगस्ट रोजी गुराढोरांसह नगर-पुणे महामार्गावर कामरगाव येथे रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. त्यानुसार आजचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तलाठी राहुल कोळेकर यांनाही निवेदन देण्यात आले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिशिरकुमार देशमुख घटनास्थळी फौजफाट्यासह उपस्थित होते.
भोरवाडी व कामरगाव या दोन्ही गावच्या शेतकऱ्यांचा व ग्रामस्थांचा स्टोन क्रेशरला विरोध असताना हुकुमशाही पद्धतीने चाललेले काम थांबवून परवाना रद्द करावा. स्टोन क्रेशरजवळील त्रस्त शेतकरी हे मोठ्या संख्येने आजी व माजी सैनिक असून, त्यांचा विचार करण्यात यावा. परिसरात ३ पाझर तलाव असून, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो. मात्र, या स्टोनक्रेशरमुळे पाण्याची पातळी घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात, असे आंदोलकांनी म्हटले.