शिर्डी- शिर्डीत डिफेन्स क्षेत्रात एक मोठं पाऊल पडलंय. इथे रणगाड्यांसाठी लागणाऱ्या बॉम्बचं आवरण म्हणजेच शेल फोर्जिंग तयार करण्याचा प्रकल्प सुरू झालाय.
या प्रकल्पाचं भूमिपूजन खुद्द पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालं. शिर्डी आता फक्त साईबाबांच्या दर्शनासाठीच नाही, तर देशाच्या संरक्षण क्षेत्रातही आपलं नाव कमवणार आहे.

हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा एक भाग आहे. सावळीविहीर खुर्द (ता. राहाता) इथल्या शिर्डी औद्योगिक वसाहतीत उद्योजक गणेश निबे यांच्या ऑर्डनन्स ग्लोबल लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आलंय.
१८० एकर म्हणजे सुमारे ३५ लाख चौरस मीटर जागेत हा प्रकल्प उभा राहणार आहे. पुढील पाच वर्षांत यातून सहा लाख शेल फोर्जिंगचं उत्पादन होणार असून, साडेचार हजार कोटींच्या ऑर्डरची नोंदणी आत्तापर्यंत झालीय.
विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे दोन हजार तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळणार आहे, असं विखे पाटील यांनी सांगितलं.
या कार्यक्रमाला आमदार आशुतोष काळे, डॉ. सुजय विखे-पाटील, कंपनीचे चेअरमन गणेश निबे, एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिर्डीत असा प्रकल्प येणं ही या परिसराच्या औद्योगिक प्रगतीसाठी मोठी गोष्ट आहे. भारतात बॉम्ब शेल तयार करणाऱ्या कंपन्या मोजक्याच होत्या, पण आता शिर्डीत हे डिफेन्स क्लस्टर सुरू झाल्यामुळे आपण स्वतः हे उत्पादन करणार आहोत.
इतकंच नाही, तर भारताबरोबरच मित्र देशांनाही हे शेल फोर्जिंग निर्यात होणार आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेलच, शिवाय देशाच्या संरक्षण क्षेत्रातही शिर्डीचं योगदान वाढेल.
शिर्डीचा विचार करताना फक्त औद्योगिकच नाही, तर शहराचा एकूण विकासही लक्षात घ्यावा लागतोय. नाशिकमध्ये येणारा कुंभमेळा जवळ आलाय, त्यामुळे शिर्डी शहराचा विस्तार करणं गरजेचं आहे. यासाठी शिर्डी संस्थानही पुढे सरसावलंय.
त्यांनी थीम पार्कसाठी २२ कोटी आणि रस्ते बांधणीसाठी ४० कोटी रुपये मंजूर केले आहेत. शहराला आणखी सुंदर आणि सोयीस्कर करण्यासाठी निधी मिळवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत, असं विखे पाटील यांनी सांगितलं.
हा प्रकल्प शिर्डीच्या विकासाला नवं वळण देणारा आहे. एकीकडे साईभक्तांचं श्रद्धास्थान असलेलं हे शहर आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे, तर दुसरीकडे आता औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्रातही आपली छाप पाडणार आहे.
स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळणं ही या प्रकल्पाची जमेची बाजू आहे. पुढच्या काही वर्षांत शिर्डीचं नाव देशाच्या नकाशावर आणखी मोठं होईल, यात शंका नाही.