अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Ahmednagar News :- शहरात काम सुरू असलेल्या उड्डाणपुलाखाली आज सायंकाळी आढळून आलेल्या बेवारस बॅगमध्ये काहीही स्फोटके किंवा धोकादायक आढळून आले नसल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
बॅग आढळून आल्याने घटनास्थळी बॉम्बशोधक आणि नाशक पथक दाखल झाले. त्यांच्याकडे असणार्या गॅजेटने बॅगेची बाहेरून तपासणी केली असता त्यातून रेड सिग्नल मिळाला होता.
नंतर ही बॅग पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर नेऊन उघडली. बॅगेत साबण, टूथ पेस्ट, औषधे असे साहित्य आढळून आले. त्यामध्ये एक तंबाखूचा पुडाही आढळून आला.
तो नशाकारक पदार्थ असल्याने रेड सिग्नल दाखवला गेला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. दरम्यान ही बॅग एका लष्करी कर्मचार्याची असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली. बुधवारी सायंकाळी एक बॅग स्वस्तिक बस स्थानकाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर उड्डाणपुलाखाली आढळून आली.
याची माहिती मिळाल्यावर बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने बॅगेमध्ये बॉम्बसदृश्य काही वस्तू आहे का, याचा शोध घेण्यासाठी त्यांचे गॅजेट लावले. त्यावर बॅगमधून रेड अलर्ट मिळाला.
त्यामुळे आतमध्ये स्फोटक वस्तू असल्याचे संकेत मिळाले होते. या प्रकारानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. त्यांनी तात्काळ नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक वळवली आणि या महामार्गाची एक बाजू मोकळी करण्यात आली होती.
बॅग सुरक्षित ठिकाणी नेऊन उघडण्यात आली. सुदैवाने या बॅगेत कोणतीही स्फोटके किंवा धोकादायक वस्तू आढळून आली नाही.