संगमनेर मतदारसंघातील विविध प्रश्नांवर राज्य शासनाचे लक्ष वेधत आमदार अमोल खताळ यांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या विधानसभेत मांडल्या आहेत. यामध्ये संगमनेर आणि अकोले तालुक्यांसाठी संगमनेर येथे सहकार न्यायालय सुरू करणे, पाणीपुरवठ्यासाठी टँकर मंजुरीच्या अटी शिथिल करणे,
पोलिस वसाहतीची दुरुस्ती, औद्योगिक विकास आणि रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे यासारख्या मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांमुळे स्थानिक जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाला ठोस पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

संगमनेर तालुक्यात सध्या पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः उन्हाळ्यात टँकरद्वारे तातडीने पाणीपुरवठा करणे आवश्यक असताना शासनाच्या जटिल अटींमुळे मंजुरी प्रक्रियेत सात ते आठ दिवसांचा विलंब होतो. यामुळे सर्वसामान्य जनतेला तहानलेपणाचा सामना करावा लागत आहे.
आमदार खताळ यांनी याकडे लक्ष वेधत टँकर मंजुरीच्या अटी शिथिल करण्याची मागणी केली. तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांच्या टेबलांवर वेळ न घालवता तात्काळ मंजुरी देण्याची व्यवस्था करावी, तसेच पाणीटंचाईवर त्वरित उपाययोजना करून लोकहिताला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी शासनाला सुचवले.
पाणी प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी जलसंपदा आणि जलसंधारण विभागाकडून अधिक निधी मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली.
याशिवाय, ग्रामीण भागातील रस्ते विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ५० किलोमीटर रस्ते वाढवण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. ऊर्जा विभागातील महत्त्वाच्या योजनांसाठीही निधीची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सर्व मागण्यांमुळे संगमनेर मतदारसंघातील पायाभूत सुविधांचा विकास साध्य होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहकार न्यायालयाच्या मागणीवर बोलताना आमदार खताळ म्हणाले की, सध्या कोपरगाव येथे असलेले सहकार न्यायालय संगमनेर आणि अकोले तालुक्यांतील सहकारी संस्थांच्या न्यायालयीन कामकाजासाठी खूपच दूर पडते.
यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. संगमनेर येथे सहकार न्यायालय सुरू झाल्यास सहकारी संस्थांना त्वरित न्याय मिळण्यास मदत होईल आणि प्रवासाचा वेळ व खर्च वाचेल. या मागणीमुळे सहकार क्षेत्रातील समस्यांचे निराकरण जलद गतीने होण्याची शक्यता आहे.
याशिवाय, संगमनेर शहरातील पोलिस वसाहतीची दयनीय अवस्था हेही एक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी उपस्थित केले. पोलिस कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी नवीन आणि सुसज्ज वसाहत उभारणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.
औद्योगिक विकासासाठीही निधीची मागणी करताना त्यांनी संगमनेर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.